प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षकांची धडक
By admin | Published: July 23, 2014 12:13 AM2014-07-23T00:13:00+5:302014-07-23T00:13:00+5:30
वणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. सीईओंना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
यवतमाळ : वणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. सीईओंना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
वणी पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकारी व्ही.डी. ढवळे यांच्या कामकाजाला शिक्षक त्रस्त झाले. नियमाला डावलून अनेक कामे त्यांनी केली आहे. या गटशिक्षणाधिकाऱ्या विरोधात तक्रार करून अनेक पुरावे दिले. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. प्रशासनाकडून उलट पाठराखण केली जाते. गैरप्रकार व फसवणूक करण्यासाठी कित्येकदा तर पाठबळही देण्यात आले आहे. जून २०१३ मध्ये पंचायत समिती अंतर्गत ४० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यात अंशत: बदल करून पदे रिक्त नसतानाही ११ शिक्षकांच्या बदल्या केल्या. गटविकास अधिकाऱ्याचा तात्पुरता प्रभार आल्यानंतर व्ही.डी. ढवळे यांनी नऊ शिक्षकांच्या बदल्या केल्या. यासाठी आर्थिक देवान-घेवान केल्याचा आरोपही प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. खोटी माहिती देऊन ५६ हजार रुपये घरभाडे भत्त्याची उचल केली. त्यांनी आपली दौरा दैनंदिनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कधीच सादर केली नाही.
आनंद महोत्सवासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली केली. कब बुलबुल मेळावा घेताना विद्यार्थी व शिक्षकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात बसून प्रकरणाचा निपटारा करण्याकडे ढवळे यांचा कल आहे. यासह तब्बल १२ प्रकारचे विविध आरोप प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे. या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शरद इंगळे, प्रमोद ढेंगळे, रायकर यांच्यासह वणी पंचायत समितीतील शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य आशिष खुलसंगे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)