बांधकाम सभापतीवर दमदाटीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 09:52 PM2018-10-04T21:52:39+5:302018-10-04T21:53:08+5:30
नगरपरिषदेत सोईचे काम करून घेण्यासाठी बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. त्यांच्याकडून फोनवर धमक्या मिळत आहे, या जाचाला कंटाळून दोन कर्मचारी व एका कंत्राटदाराने थेट मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेत सोईचे काम करून घेण्यासाठी बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. त्यांच्याकडून फोनवर धमक्या मिळत आहे, या जाचाला कंटाळून दोन कर्मचारी व एका कंत्राटदाराने थेट मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली. या तक्रारीचाच आधार घेऊन नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बांधकाम सभापतीची तक्रार केली आहे.
नगरपरिषदेतील दबंग पदाधिकारी म्हणून प्रजापती यांची ओळख आहे. या इमेजचा फायदा घेत ते कर्मचाऱ्यांना धमकावितात. यामुळे अनेक कर्मचारी अतिरिक्त पदभार घेण्यास तयार नाहीत. या गंभीर प्रकाराची तक्रार कर विभागातील विनोद बारस्कर यांनी केली आहे. बारस्कर यांच्याकडे मुख्याधिकाºयांनी पाणीपुरवठा विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. प्रशासकीय कामात थेट हस्तक्षेप करत प्रजापती कुठल्याही स्वरूपाचे शासकीय दस्तावेज मागतात. चुकीच्या फाईली काढण्यासाठी दबाव टाकतात. यासाठी फोनवरून फिल्मी स्टाईलने पाहून घेण्याची धमकी दिली जाते. सातत्याने शासकीय कामात ढवळाढवळ होत असल्याने याचा परिणाम प्रकृतीवर झाल्याचे बारस्कर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याच पद्धतीची तक्रार आस्थापना विभाग प्रमुख व लेखा परिक्षक आर.के. बेनकर यांनी केली आहे. बांधकाम विभागाकडून येत असलेल्या नस्ती व फाईलमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुट्या असतात. या त्रुट्या असलेल्या फाईली तत्काळ काढण्यासाठी सभापतीकडून दबाव आणला जातो. २८ आॅगस्ट रोजी अतिशय खालच्या भाषेत बोलत उद्धटपणाची वागणूक दिली. निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक असताना या कामाचा दबाव सहन होऊ शकत नाही. शिवाय चुकीची कामे करून अडचणीत येणे शक्य नाही. त्यामुळे आर.के. बेनकर यांनीसुद्धा मुख्याधिकाºयांकडे अर्ज करून लेखा परिक्षकाचा प्रभार काढून घेण्याची मागणी केली. प्रजापती यांच्या कारवाईमुळेच त्रस्त झाल्याने टक्केवारीवरून नेहरू उद्यानात तारांगण प्रकल्प करणाºया गणेश इनोव्हेशन अकोला यांनी निविदा मंजूर झाल्यानंतरही राजकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन तारांगणाचे बांधकाम करण्यास असमर्थ असल्याचे पत्र दिले होते. यात खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर त्या कंत्राटदाराने तारांगण बांधकाम करण्यास मान्य केले. अशा एक ना अनेक प्रकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप केला. सभापतीसाठी स्वतंत्र कक्ष असताना त्यांनी बांधकाम विभाग प्रमुखाच्या कक्षात स्वत:चे बस्तान मांडले आहे. बांधकाम अभियंत्याच्या खुर्चीला खुर्ची लाऊन सभापती बसत असल्याने प्रशासकीय कामे अडचणीत आली आहे. शिवाय नगरपरिषदेचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून तो परत जाण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे, असे असतानाही सभापती ढवळाढवळ करतात. त्यामुळे याबाबत प्राप्त तक्रारींचा विचार करून यवतमाळकर जनतेचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.