उमरखेड नगरपरिषदेत ६४ लाखांचा अपहार? नगराध्यक्ष, नगरसेवकासह सीओंविरुद्ध नोंदविणार गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 02:35 PM2022-02-03T14:35:19+5:302022-02-03T14:37:57+5:30
उमरखेड नगरपरिषदेत स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत २०१७ मध्ये विविध कामे करण्यात आली. शिवाय घनकचरा व्यवस्थापनाचेही काम झाले. या कामात ६५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
यवतमाळ : उमरखेड नगरपरिषदेत स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत २०१७ मध्ये विविध कामे करण्यात आली. शिवाय घनकचरा व्यवस्थापनाचेही काम झाले. या कामात ६५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक व संबंधित कंत्राटदार यांच्याविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आता या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे.
उमरखेड आमदार नामदेव ससाने हेच नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी संगनमताने घनकचार कंत्राटासह इतर कामांमध्ये ६५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली. नगरसेवक शेख जलील अहेमद उस्मान यांनी ही तक्रार नगरविकासमंत्र्यांकडे केली. सन २०१८ मध्ये कुठलाही नोंदणीकृत कंत्राट परवाना नसलेल्या गजानन मोहळे व फिराेज खान आझाद खान यांना कंत्राट देण्यात आले. दहा लाखांच्या वरचे काम करायचे असल्यास ई-निविदा काढणे अनिवार्य आहे. मात्र, या कामाची ई-निविदाही काढण्यात आली नाही.
या दोन्ही कंत्राटदारांच्या नावाने देयकाची रक्कम ४४ लाख ३८ हजार, तर सात लाख ५९ हजार परस्पर कंत्राटदारांना देण्यात आली. त्यानंतर २६ मार्च २०१८ च्या स्थायी समिती सभेत या कामाला कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली. या स्थायी समिती सभेला पाच नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी कार्योत्तर मान्यतेचा ठराव मंजूर केला. त्यामुळे त्यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप तक्रारदार नगरसेवकाने केला होता.
तक्रारदाराने ७ जानेवारी २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीतील अपहाराची सहा मुद्यांची तक्रार केली. त्यात पोकलेन मशीन, टिप्पर, मजूर पुरवठा अशा देयकांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारेच पुन्हा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. अहवालातील नमूद मुद्यांवर मंत्र्यांनी शिक्कामोर्तब करीत या प्रकरणात तत्काळ नगराध्यक्ष, स्थायी समितीचे सदस्य असलेले नगरसेवक, मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश
नगर परिषदेत एकहाती सत्ता असल्याचा गैरवापर करण्यात आला. मनमर्जीने पैशाची उधळपट्टी केल्याची तक्रार पुराव्यानिशी नगरसेवक शेख जलील अहेमद उस्मान यांनी केली. यानंतर, सलग दोन वर्षे त्यांनी या अपहारातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
तर भाजप जिल्हाध्यक्षही अडचणीत
उमरखेड नगरपरिषदेमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे स्वीकृत नगरसेवक आहेत. ते पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य होते. त्यामुळे या प्रकरणात फौजदारी दाखल होऊन चौकशी झाल्यास भुतडाही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कंत्राट परवाना नसलेल्या मर्जीतील व्यक्तीला दिले काम
उमरखेड नगरपरिषदेतील घनकचरा सफाईच्या कामावर टिप्पर, पोकलॅन्ड मशीन, मजुरांचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंत्राटासाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबविली नाही. पदाधिकाऱ्यांनी मर्जीतीलच व्यक्तीला पात्र, अपात्रता न तपासता थेट कंत्राट देवून देयकाची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा केली. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५५ अ व ब चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
नगराध्यक्ष ससाणे होणार पायउतार ?
नगराध्यक्ष या नात्याने या अपहारात नामदेव ससाने यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा ठपका आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना नगराध्यक्षपदासाठी अनर्ह ठरवावे, असा आदेश नगरविकासमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या आदेशानुसार कारवाई केल्यास नामदेव ससाने यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
नगरविकासमंत्र्यांचा आदेश नगर प्रशासन विभागाकडे प्राप्त झाला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करून अहवाल सादर केला जाईल.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ