चौथी उत्तीर्ण युवकाने बनविली चार्जिंग सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:18+5:30
संतोष केवळ चौथा वर्ग शिकला. तो रोजमजुरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावतो. त्याने एक जुनी रेंजर सायकल विकत घेतली. चार्जिंगसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या. त्यातूनच त्याने चार्जिंगवरील सायकल विकसित केली. ही सायकल सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. त्याने तब्बल १५ हजारांचा खर्च केला. ही सायकल पर्यावरणपूरक आहे. मात्र ती तयार करण्यासाठी त्याला ॲॅक्सीलेटर कंट्रोलर किट विकत घ्यावी लागली.
ज्ञानेश्वर ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : यू-ट्यूबवरील व्हिडीओ बघून येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेला व केवळ चौथी शिकलेल्या संतोष कावळे या युवकाने बॅटरीवर चालणारी सायकल विकसित केली. त्याच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संतोष केवळ चौथा वर्ग शिकला. तो रोजमजुरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावतो. त्याने एक जुनी रेंजर सायकल विकत घेतली. चार्जिंगसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या. त्यातूनच त्याने चार्जिंगवरील सायकल विकसित केली. ही सायकल सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. त्याने तब्बल १५ हजारांचा खर्च केला. ही सायकल पर्यावरणपूरक आहे. मात्र ती तयार करण्यासाठी त्याला ॲॅक्सीलेटर कंट्रोलर किट विकत घ्यावी लागली.
काही तरी नवीन तांत्रीक बाब शोधून वेगळे करण्याची प्रवृत्ती असलेल्या संतोषने यू-ट्यूबवरुन चार्जिंगवरची सायकल तयार करता येईल का ?, या दिशेने प्रयत्न केले. त्यात तो यशस्वी झाला. त्याचा हा चार्जिंगवर वर चालणाऱ्या सायकलचा प्रयोग बघून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात संतोषचा गौरव करून त्याला प्रशस्तीपत्र दिले. या सायकलीत आणखी सुधारणा करावयाच्या असल्यास आपण मदत करू, अशी ग्वाही देवसरकर यांनी दिली.
यावेळी पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे, अशोक जाधव, नगरसेवक राजू राठोड, महेंद्र कावळे, नानासाहेब भवरे, समाधान ठाकरे, संजय पाटे आदी उपस्थित होते.
दररोज ४0 किलोमीटरची धाव
संतोषने सायकलच्या मागच्या चाकाला मोटर बसवली व त्याचे कनेक्शन कंट्रोलरला दिले. हँडलवर हेडलाईट बसवले. ही सायकल तीन तास चार्ज केल्यानंतर ३0 च्या वेगाने प्रति दिन ४0 किलोमीटर चालते. बॅटरीची चार्जिंग संपल्यास पायडल मारुन सायकल चालविता येते. या सायकलवर मोटारसायकलाचा आनंद घेता येतो.
ग्रामीण भागात गुणवत्ता
संतोषच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातही गुणवत्तेची कमी नसल्याचे दिसून येते. ग्रामीण विद्यार्थी आणि युवकांमध्ये गुणवत्तेसह कल्पकतासुद्धा ठासून भरली आहे. केवळ त्याला चालना मिळण्याची गरज आहे. अनेक होतकरू तरुण संधीअभावी पुढे जावू शकत नाही. मात्र संतोषने अडचणींवर मात केली.