‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:34 PM2019-01-19T23:34:14+5:302019-01-19T23:38:26+5:30
डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा विषय चांगलाच गाजला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा विषय चांगलाच गाजला.
बांधकाम सभापती निमिष मानकर यांनी लोकमतमधील बातमीचा हवाला देत प्रश्न उपस्थित केला. कळंब येथे सुरु असलेला काय प्रकार आहे. औषधोपचार करणाऱ्यांकडे वैद्यकीय पदवी आहे काय. डोळ्यात टाकत असलेल्या औषधांचे प्रमाणिकरणाची नोंद आहे काय. हा कॅम्प नियमानुसार आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले.
कोल्हापूर येथील विनायक गुरव व त्यांच्या सहकाºयांच्या पुढाकारातून कुठलीही माहिती व फलक न लावता हे कॅम्प भरविले जाते. डोळ्यात औषध टाकण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये घेतले जाते. एका रुग्णाला पाच ते सहा वेळा औषध टाकण्याचे सांगितले जाते. परिणामी एक रुग्ण पाचशे ते सहाशे रुपये खर्च करीत आहे.
गुरुवारी धडकणार समिती
नेहमीप्रमाणे येत्या गुरुवारी हा कॅम्प लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील एक वैद्यकीय चमू कळंब येथे धडकणार आहे. यावेळी कोण औषधोपचार करतो आणि ते कितपत योग्य आहे. याची माहिती घेतली जाणार आहे.
कळंब येथील डोळ्याच्या कॅम्पचा विषय स्थायी समितीत चर्चेत आला. संबंधित यंत्रणेला चौकशी करण्याचे आदेश दिले. होत असलेला प्रकार नियमबाह्य असल्यास कारवाई होईल.
- नंदिनी दरणे
सभापती, शिक्षण व आरोग्य समिती