मृत मजुराच्या नावे वटविला धनादेश
By admin | Published: March 11, 2016 02:54 AM2016-03-11T02:54:34+5:302016-03-11T02:54:34+5:30
तालुक्यातील कोव्हळा येथे सचिवाने बीआरजीएफच्या रकमेत अफरातफर केली असून मृत मजुराच्या नावे धनादेश वठविला,
कोव्हळातील प्रकार : सचिवावर कारवाईचे आदेश
नेर : तालुक्यातील कोव्हळा येथे सचिवाने बीआरजीएफच्या रकमेत अफरातफर केली असून मृत मजुराच्या नावे धनादेश वठविला, अशा तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.
सचिवाने १० हजार ५०० इतक्या रकमेचा मजुराच्या नावाचा धनादेश विड्रॉल केला. प्रत्यक्षात या मजुराचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तक्रार माजी सरपंच नंदकुमार तलवारे यांनी केली. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिल २०१५ रोजी ग्रामसेविकेला व तक्रारकर्ते तलवारे यांना चौकशीसाठी बोलाविले होते. मागास क्षेत्र विकास निधी अंतर्गत सिमेंट रोडचे काम करण्यात आले. सदर कामावरील एकही मजूर ग्रामसेविका दाखवू शकल्या नाही. त्यामुळे पंचायत समितीने पुन्हा १० आॅगस्ट २०१५ रोजी नमूद मजुरांना चौकशीसाठी बोलाविले. यावेळी हजर झालेले रफीक हैदर शहा, सुधाकर राऊत, चेतन काळे यांनी आपण या कामावर मजूर म्हणून कामच न केल्याचे बयाण नोंदविले. ज्याच्या नावे धनादेश वटविण्यात आला तो मजूर २६ जानेवारी २०१३ रोजी मृत पावलेला आहे. परंतु त्याला ९०० रुपये मजुरी दिल्याची नोंद आहे. यावरून सचिवाने आर्थिक घोळ केल्याचे स्पष्ट झाले. सदर ग्रामसेविकेवर कारवाई करून रक्कम वसूल करण्याची सूचना विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात दिली. मात्र अजूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे माजी सरपंच नंदकुमार तलवारे यांनी कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)