छगन भुजबळांचा कारागृहातून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:34 PM2018-03-03T14:34:00+5:302018-03-03T14:34:07+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे. त्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट कारागृहातून लक्षवेधी सूचना मांडली आहे.
माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेच्या येवला मतदारसंघाचे (जि. नाशिक) आमदार छगन भुजबळ यांनी १ मार्च २०१८ रोजी विधानसभेच्या प्रधान सचिवांना आपली लक्षवेधी सूचना लेखी स्वरूपात मांडली. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) यांच्या समक्ष व स्वाक्षरीने ही लेखी सूचना भुजबळांच्या लेटर हेडवर सचिवांकडे पोहोचली आहे. राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा ९ फेब्रुवारी २०१८ चा शासन निर्णय लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. शासनाने हा जीआर तत्काळ रद्द करावा, किमान दहा वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्यासंबंधी धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या लेखी लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. कारागृहात असूनही विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेण्याची भुजबळांची तळमळ या लक्षवेधीतून दिसून येते. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत.