मुख्यमंत्री, नितीन गडकरी आज जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:11 AM2017-12-24T01:11:34+5:302017-12-24T01:12:03+5:30
केंद्र शासनाने सुरू केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे रविवार, २४ डिसेंबरला जिल्ह्यात आगमन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने सुरू केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे रविवार, २४ डिसेंबरला जिल्ह्यात आगमन होत आहे.
बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील १५ सिंचन प्रकल्पांचा बळीराजा जलसंजीवन योजनेंतर्गत शुभारंभ केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे विविध मंत्री रविवारी घारफळ येथे येत आहे. मुख्यमंत्र्यांचे १.२५ वाजता, तर ना. गडकरी यांचे १.३० वाजता घारफळ येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. तेथून ते योजनेचा मुख्य कार्यक्रम असलेल्या शिवाजी विद्यालयात पोहोचणार आहे. दुपारी १.४० वाजता योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.