भाजपा कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:08 PM2017-12-22T22:08:27+5:302017-12-22T22:09:13+5:30
राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
रविवार २४ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यांवर येत आहेत. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ ते करणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातील हा नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही चौथी-पाचवी भेट असेल. मात्र कार्यकर्त्यांची साधी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची हौसही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री सहज भेटत नाहीत, ही कार्यकर्त्यांचीच नव्हे तर अनेक पदाधिकाऱ्यांचीही ओरड असल्याचे सांगितले जाते.
कार्यकर्त्यांची आमदारांप्रती, आमदारांची मंत्र्यांप्रती तर मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांप्रती नाराजीचे हे चक्र भाजपात फिरत आहे. बदल्यांची कामे होत नाहीत म्हणून आमदार मंडळी नाराज आहे. बदलीचे काम घेऊन गेले तर पारदर्शकता व प्रिन्सीपल पुढे केले जाते, असा पदाधिकाºयांचा सूर आहे. कामेच होत नसतील तर मतदारसंघातील खर्च भागवायचे कसे असा प्रश्न खासगीत उपस्थित केला जात आहे.
बड्या लोकप्रतिनिधींची ही व्यथा असली तरी सामान्य कार्यकर्त्यांची व्यथा मात्र अगदीच सामान्य आहे. जनतेच्या समस्या सोडविणे, घेऊन गेलेले काम करून देणे तर दूरच साधे पत्रही मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधींप्रती ओरड आहे. मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. आता रविवारी तरी मुख्यमंत्र्यांशी भेटीची संधी मिळते का याची कार्यकर्त्यांना आस लागली आहे. पक्षस्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये ‘केवळ संघटनात्मक बांधणीवर बोला, सरकारबद्दल बोलू नका’, अशा स्पष्ट सूचना आधीच दिल्या जातात. त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा सरकारच्या कारभाराबद्दल ब्र काढण्याची सोय राहिलेली नाही.
एकूणच कार्यकर्ते निराश आहेत. त्यांना ‘लाभ’ तर दूर साधा भाजपा सरकारमधील सत्तेचे ‘लाभार्थी’ असलेल्या घटकांसोबत फोटो काढण्याचीही उजागरी राहिलेली नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये भाजपा सत्तेत असूनही रोष पहायला मिळतो. सत्तेत नव्हतो तेव्हा अधिक कामे होत होती, नेतेही वेळ देत होते, ही सामान्य कार्यकर्त्यांची बोलकी प्रतिक्रिया नेते मंडळींना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
‘लाभार्थी’ : कुणी वृक्ष तोडतोय, कुणी मत्स्य पकडतोय
भाजपा सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचाच कित्ता गिरवित आहे. तीन वर्षे लोटली तरी सामान्य कार्यकर्त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मंडळ-महामंडळ तर दूर साध्या समित्यांवरही वर्णी नाही.
‘लाभार्थी’ होण्याची संधी लोकप्रतिनिधींचे डावे-उजवे असलेल्यांनाच मिळते. त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आणि चेहरेही ठरलेलेच आहेत.
दुसºया फळीतील कार्यकर्त्यांना लाभ नव्हेतर पक्ष-संघटनेतील पद देऊन बोळवण केली जाते.
हातात झेंडा घेऊन पक्ष जिवंत ठेवणारे कार्यकर्ते मात्र अजूनही कोसोदूर आहेत. मुख्यमंत्री, मंत्री तर दूर आमदारही त्यांना जवळ फटकू देत नाहीत, अशी ओरड आहे.
भाजपात आजच्या घडीला संधी साधूंची चालती आहे. कुणी राष्ट्रीय महामार्गावर दहा कोटी बजेटचे वृक्ष तोडतोय तर कुणी निवडणुकीत स्पर्धक राहूनही धरणातून ट्रकने मासोळ्या काढून विकतोय.
शासनाचे विभागही ‘हिशेबा’साठी निकटवर्तीयांना वाटून दिले गेले आहेत. डावे-उजवे असलेल्या प्रत्येकाला काहीना काही ‘लाभ’ मिळतो आहे.