पोलीस तपासणी जीवावर बेतली?; चौकशीसाठी वारंवार थांबवलेल्या कारमधील चिमुरड्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 08:31 PM2020-03-27T20:31:53+5:302020-03-27T20:32:19+5:30

Coronavirus Lockdown संचारबंदीत बळी गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

child dies after police repeatedly stopped vehicle for checking during lockdown kkg | पोलीस तपासणी जीवावर बेतली?; चौकशीसाठी वारंवार थांबवलेल्या कारमधील चिमुरड्याचा मृत्यू

पोलीस तपासणी जीवावर बेतली?; चौकशीसाठी वारंवार थांबवलेल्या कारमधील चिमुरड्याचा मृत्यू

Next

-गजानन अक्कलवार

यवतमाळ: संचारबंदीत चौकशीसाठी जागोजागी थांबवण्यात आलेल्या वाहनातील आजारी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रोहित अनिल सोळंके (दोन वर्षे) रा. माथावस्ती कळंब, असे या बालकाचे नाव आहे. एकुलता एक मुलगा दगावल्याच्या धसक्याने आई-वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मागील आठ दिवसांपासून रोहितची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी सकाळी १० वाजता ती आणखी बिघडली. रोहितला यवतमाळ येथे रुग्णालयात नेण्यासाठी वसाहतीमधीलच जीवन जवळकर यांची गाडी भाड्याने घेण्यात आली. यवतमाळ येथे डॉ.विनायक कुळकर्णी यांच्या रुग्णालयात जाताना ही गाडी यवतमाळ येथे पांढरकवडा बायपासवर पोलिसांनी अडवली. रुग्ण असल्याचे सांगितल्याने गाडी तत्काळ सोडण्यात आली. पुढे शारदा चौकात ती पुन्हा अडवली गेली. तिथे पोलिसांना गयावया करण्यात आली. इथे जवळपास आठ ते दहा मिनिटे गेली. 

तेथून निघाल्यानंतर अवधुतवाडी पोलीस ठाण्याजवळ अडवण्यात आली. याठिकाणी एक महिला पोलीस कर्मचारी व इतरांनी बरीच विचारपूस केली. एवढेच नाही तर, दवाखान्याची कागदपत्रेही मागितली. या तपासणीत जवळपास दहा मिनिटांचा वेळ गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रोहित मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दहा-पंधरा मिनिटे आधी आणले असते तर, उपचार करता आला असता, असे डॉक्टरांनी म्हणताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. रोहितचे कलेवर कळंब येथे आणण्यात आले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी चौकशीत वेळ घालवल्यानेच रोहित दगावल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. 

रुग्णांसाठी रस्ता मोकळा असावा - चालक 
कोरोनामुळे सर्वत्र बंदोबस्त आहे. ही गोष्ट आवश्यक असली तरी, रुग्णांना तत्काळ रस्ता मोकळा करुन देणे आवश्यक आहे. आज एका बालकाचा वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाला. यापुढे असा प्रकार होऊ नये, अशी प्रतिक्रिया चालक जीवन जऊळकर यांनी दिली. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराचा व्हिडीओ जीवन जऊळकर यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला.

धक्का बसला- धनराज सोळंके
आमच्या घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने मोठा धक्का बसला. वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचिच रोहित वाचला असता. परंतु त्याला उपचार मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो, अशी हताश प्रतिक्रिया रोहितचे काका धनराज सोळंके यांनी दिली. 

एसीपींनी मागितला अहवाल 
दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी संबंधित पोलिसांकडून मागितली आहे. कळंबचे ठाणेदार विजय राठोड यांनाही याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 

अशी कोणतीही घटना घडली नाही. चालकाने सांगितलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहे. चालकालाही चौकशीसाठी यवतमाळला पाचारण करण्यात आले. त्याची चौकशी केली जात आहे. 
- प्रदीप शिरस्कर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ.

 

Web Title: child dies after police repeatedly stopped vehicle for checking during lockdown kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.