कुलरचा शाॅक लागून चिमुकल्याचा मृत्यू, अडकलेला कचरा काढणे बेतले जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 07:36 PM2022-04-20T19:36:09+5:302022-04-21T17:06:22+5:30
Death Case सुस्वाभावी व कुशाग्रबुद्धीचा संकल्प सर्वांचा लाडका होता.
यवतमाळ : तालुक्यातील सावर येथे कुलरमध्ये अडकलेला कचरा काढताना शाॅक लागून ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली.
संकल्प अमोल ढवळे (११) असे मृत बालकाचे नाव आहे. संकल्प हा दुपारी आजोबासोबत घरात आराम करीत होता. कुलरची हवा थंड येत नसल्याने तो चालू कुलरमध्येच कचरा साफ करण्यास गेला. त्याने टपातील बंद पडलेले छिद्र साफ करण्यासाठी दाबनाचा वापर केला. त्याला जोरदार झटका बसला. शेजारी असलेल्या आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ कुलर बंद केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली. हसतखेळत राहणारा संकल्प जागेवरच गतप्राण झाला. आई, वडिलांनी तत्काळ संकल्पला मिळेल त्या वाहनाने यवतमाळ शासकीय रुग्णालयात आणले. डाॅक्टरांनी संकल्पची तपासणी केली व त्याला मृत घोषित केले. क्षणात घरातील सर्वांचा लाडका एकुलता एक संकल्प काळाच्या पडद्याआड गेला. त्याची आई व वडिलांचे भान हरपले. काय घटना घडली हे त्यांना कळतच नव्हते. नातेवाईकांनीही रुग्णालय गाठून शोक व्यक्त केला. सुस्वाभावी व कुशाग्रबुद्धीचा संकल्प सर्वांचा लाडका होता.