बाळ अपहरणाने सुरक्षेची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:22 PM2017-11-08T23:22:49+5:302017-11-08T23:22:59+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून याविषयी संताप व्यक्त होत आहे. अता या घटनेनंतर प्रशासन कोणते पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
येथील ग्रामीण रूग्णालयाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. शहराच्या ५० हजार गोरगरिब नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारे ग्रामीण रूग्णालयच आजारी झाले आहे. ही बाब येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा वैद्यकीय अधीक्षक व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र प्रशासनने ही बाबच गंभीरतेने न घेतल्याने आज दवाखान्यातून बाळाचे अपहरण करण्यापर्यंत असामाजिक घटकांची मजल गेली आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. शासन महिलेची प्रसुती दवाखान्यातच करण्याचा आग्रह धरतात. मात्र त्याची सोय करून देण्याची जबाबदारी कोणी घेत नाही.
येथील अस्वच्छता कळसाला पोहोचली आहे. त्यामुळे या रुग्णालयात उपाचार घेणाºया रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नसल्याने रूग्णांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. सुरक्षा तर जणू वेशीवर टांगली आहे. या रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही. घटनेच्या रात्री प्रसुती वॉर्डाचे दार रात्रभर सताड उघडे होते. रात्री रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. हे कर्मचारीही रूग्णांना मोकाट सोडून झोपा घेत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
दवाखान्यातील सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विविध वॉर्डात व परिसरातील नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र या कॅमेºयामध्ये दृश्य साठवून ठेवले जात नाही. जेव्हा बाळाच्या अपहरणाची घटना घडली. त्यावेळी कॅमेºयाची तपासणी केली असता, त्यामधील हार्डडीस्क गायब असल्याचे निदर्शनास आले.
मनसेच्या निवेदनाला प्रशासनाकडून केराची टोपली
येथील ग्रामीण रूग्णालयातील असुविधेबाबत मनसेने ८ नोव्हेंबरलाच वैद्यकीय अधिकाºयांना निवेदन देऊन सतर्क केले होते. यापूर्वीही अनेकदा मनसेने निवेदने दिली. मात्र आरोग्य विभागाने ग्रामीण रूग्णालयातील कारभार सुधारण्याकडे लक्षच दिले नाही. आता तर आमच्यावर केसेस झाल्या तरी चालेल पण रूग्णालयाची व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा रूग्ण सेवा केंद्राचे अध्यक्ष धनंजय त्रिंबके यांनी दिला आहे.