यवतमाळ जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बालविवाह; गाव समिती बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 07:23 PM2021-05-06T19:23:19+5:302021-05-06T19:24:38+5:30
Yawatmal news एकीकडे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गावेच्या गावे पिंजून काढत आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत एका अल्पवयीन मुलीचा धूमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गावेच्या गावे पिंजून काढत आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत एका अल्पवयीन मुलीचा धूमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला. गंभीर म्हणजे, या गुन्ह्यात खुद्द गाव समितीच सर्व माहिती असूनही शांत बसली. त्याहून गंभीर म्हणजे गाव समितीचे प्रमुख असलेले आजी व माजी सरपंच हेही वऱ्हाडी म्हणून या लग्नात सामील झाले.
कळंब तालुक्यात यवतमाळ-पांढरकवडा महामार्गावरील एका खेड्यात बुधवारी हा बालविवाह वाजतगाजत पार पडला. याची खबर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच गुन्हा दाखल करण्याची धडपड सुरू झाली. मुलीला व संबंधितांना ताब्यात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा चमू बाल कल्याण समितीसमोर आला. संबंधित गावातील बालसंरक्षण समिती म्हणजे, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका हे सारेच या विवाहाच्या बाजूने उभे राहिले. पोलिसात तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढे आले नाही. या गाव समितीने स्पष्ट नकार दिला. वास्तविक, या विवाहाची पूर्वकल्पना गाव समितीने जिल्हास्तरावर देऊन बालविवाह रोखणे नियमानुसार आवश्यक होते. असे न करता समिती सदस्यांनीच विवाहाला पाहुणे म्हणून हजेरी लावली. जिल्ह्यातील बाल कल्याण समितीने मुलीच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता, गुन्हा दाखल करण्यास ग्रामसेवक, पोलीस यांना आदेश न देता मुलीला अल्पवयात लग्न लावून देणाऱ्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे बाल कल्याण समिती व बाल न्याय यंत्रणेच्या कार्यतत्परतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कमी वयात प्रेम प्रकरण
या प्रकरणातील मुलगी केवळ १५ वर्षांची आहे. गावातीलच २२ वर्षीय युवकासोबत तिचे लग्न लावण्यात आले. या दोघांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या काळात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाल्याने आता बदनामी टाळण्यासाठी घरच्या मंडळींनी लग्न लावून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारात आता १५ वर्षांच्या कोवळ्या मुलीचे आयुष्य पणाला लागले आहे.