इसापूरच्या बालिकेचा जळगावात बालविवाहाचा घाट उधळला

By अविनाश साबापुरे | Published: June 11, 2023 03:47 PM2023-06-11T15:47:00+5:302023-06-11T15:47:09+5:30

बालसंरक्षण कक्षाची धडक कारवाई : नातेवाईकांचा घेतला लेखी जबाब

Child marriage of Isapur girl in Jalgaon was stoped | इसापूरच्या बालिकेचा जळगावात बालविवाहाचा घाट उधळला

इसापूरच्या बालिकेचा जळगावात बालविवाहाचा घाट उधळला

googlenewsNext

यवतमाळ : जिल्ह्यातील केवळ १४ वर्षे वय असलेल्या बालिकेचा जळगावातील व्यक्तीशी बालविवाह लावून देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र याची भणक लागताच बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने मुलीच्या घरी धडक देत आठवडाभरापूर्वीच हा डाव उधळून लावला.

दिग्रस तालुक्यातील इसापूर गावातील १४ वर्षीय बालिकेचा विवाह पुढच्या आठवड्यात जळगाव येथे नियोजित होता. त्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली. त्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व गावपातळीवरील बालसंरक्षण समितीने तातडीने कारवाई केली. होणारा बालविवाह वेळीच रोखला. मुलीला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. तसेच मुलीच्या घरी भेट देऊन मुलीच्या कुटुंबास व इतर नातेवाईकांना समज देण्यात आली. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे वय १८ वर्षे झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा लेखी जबाब उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिला. बालिकेला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात येणार आहे. यावेळी महिला व बालविकास विभागाकडून गावातील जबाबदार व्यक्तींना बालविवाहाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

सदर कारवाई जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, दिग्रसचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव, चाईल्ड लाईनचे गणेश आत्राम व पूजा शेलारे, ग्रामसेवक डी. ए. इंगळे, सरपंच गजानन गावंडे, पोलीस पाटील ओम खोडे, अंगणवाडी सेविका रंजना जाधव, आशासेविका वर्षा मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याकरिता दिग्रसचे पोलिस निरीक्षक सोनुने यांचे विशेष सहकार्य लाभले. 

नागरिकांनी बालविवाहाबाबत सतर्क राहावे. बालविवाहाबाबत माहिती असल्यास त्वरित चाइल्ड लाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकवर माहिती द्यावी. नाव गोपनीय ठेवले जाईल.
- प्रशांत थोरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ

Web Title: Child marriage of Isapur girl in Jalgaon was stoped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.