बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

By अविनाश साबापुरे | Published: May 10, 2024 07:41 PM2024-05-10T19:41:22+5:302024-05-10T19:41:33+5:30

अक्षय्य तृतीयेचा साधला होता मुहूर्त, प्रशासनाने केली कारवाई

Child marriage prevented: Five minor girls' lives saved | बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

यवतमाळ : कमी वयात मुलीचे लग्न लावणे गुन्हा असण्यासोबतच ही बाब तिच्या आरोग्यासाठीही घातक ठरते. मात्र आजही बालविवाहांचे प्रकार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी अक्षय्य तृतियेचा शुभमुहूर्त साधून जिल्ह्यात तब्बल पाच बालिकांचा बालविवाह लावण्याचा घाट घालण्यात आला होता. ऐनवेळी प्रशासनाचे पथक मांडवात धडकल्याने हे पाचही विवाह रोखण्यात आले.

जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील खेकडी, घाटंजी तालुक्यातील मुरली, उमरखेड तालुक्यातील कळमुला व देवसरी, महागाव तालुक्यातील फुलसावंगी या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही कारवाई बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने पार पाडली.

जिल्ह्यात अक्षय तृतियेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बालविवाह होऊ शकतात, असा अलर्ट राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने देशभरातील सर्व जिल्ह्यांना पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. जिल्हा बालसंरक्षण कक्षानेबालविवाह प्रतिबंधासाठी गावपातळीपर्यंत प्रयत्न वाढविले होते. तरीही शुक्रवारी तब्बल सात बालविवाहांचा घाट घातल्या गेल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली.

खेकडी (ता. दिग्रस) येथे २, मुरली (ता. घाटंजी) येथे १, कळमुला व देवसरी (ता. उमरखेड) येथे २, फुलसावंगी (ता. महागाव) येथे १, पांढरकवडा येथे १ अशा एकूण ७ नियोजित बालविवाहांबाबत अज्ञात व्यक्तींकडून प्रशासनाला माहिती पुरविण्यात आली होती.  त्यानंतर जिल्हा बाल व विकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात तातडीने पथके रवाना करण्यात आली. बालिकांच्या वयाची शहानिशा केली असता ५ बालिका अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तर दोन  बालिकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असल्याने त्यांना विवाह करण्यास संमती देण्यात आली.

अज्ञात व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर पथकाने धडक देऊन संबंधित कुटुंबातील पालकांना बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्ष कारावास होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित पालकांनी मुलीला १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचे लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र दिले आणि बालविवाह थांबविले. सर्व अल्पवयीन बालिका, नियोजित वर, लग्न लावून देणारे नातेवाईक यांना बाल कल्याण समितीपुढे हजर करण्याची प्रक्रिया जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे सुरु आहे.

या कार्यवाहीसाठी दिग्रस, उमरखेड, महागाव, घाटंजी, पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, दिग्रसचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सखाराम माने, उमरखेडचे बाल विकास प्रकल्प अधिकारी परांडे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सहकार्य लाभले. बाल संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक फाल्गुन पालकर, सुपरवायझर गणेश आत्राम, मनीष शेळके, पूनम कनाके व केस वर्कर शुभम कोंडलवार, अश्विनी नासरे, पूजा शेलारे यांनी ही कारवाई पार पाडली.

मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे होण्यापूर्वी विवाह केल्यास तो बालविवाह ठरतो. अशा बालविवाहाबाबत माहिती असल्यास ग्रामसेवक, गाव बालविवाह प्रतिबंध अधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील अथवा चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे करण्यात आले.

Web Title: Child marriage prevented: Five minor girls' lives saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.