प्रशासनाला गुंगारा देऊन बालविवाह, अखेर पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 05:00 AM2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:06+5:30
सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत तिचे लग्न न करण्याबाबत नातेवाइकांनी लिहून दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चार दिवसांपूर्वी नेर तालुक्यात रोखलेला बालविवाह कायद्याला न जुमानता पुन्हा लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच मुलीचा लग्नसोहळा घाटंजी तालुक्यात आयोजित करण्यात आला. मात्र डीजेवर अखेरचे मंगलाष्टक वाजत असतानाच तहसीलदार, पोलीस अन् बालसंरक्षणचे कर्मचारी मांडवात धडकले अन् साऱ्यांची पळापळ झाली. शेवटी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनच हा बालविवाह थांबविण्यात आला.
सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत तिचे लग्न न करण्याबाबत नातेवाइकांनी लिहून दिले होते. मात्र त्यांनी केवळ प्रशासनाची दिशाभूल केली. नंतर त्याच मुलीचा विवाह घाटंजी तालुक्यातील पंगडी गावात वरमंडपी २० एप्रिलला आयोजित केला. परंतु, या चलाखीबाबत घाटंजी येथील तहसीलदार पूजा माटोडे यांना माहिती मिळताच त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षाला अलर्ट केले. त्यानंतर पोलिसांसह संपूर्ण चमू थेट लग्नमंडपीच धडकली. तेव्हा लग्नाचा मंडप, डीजे, रोषणाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू होता. शेवटचे मंगलाष्टक सुरु होते. मात्र वेळीच प्रशासन धडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली. कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे तसेच बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.
या घटनेत संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९,१०, ११, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, २६९, ३४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड विनियमन २०२० च्या कलम ११ नुसार घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहे.
ही कार्यवाही तहसीलदार पूजा माटोडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात घाटंजीचे पोलीस उपनिरीक्षक भुजाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडी सेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मून, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम आदींनी पार पाडली.बालविवाहाबाबत माहिती असल्यास ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड लाइनला कळवावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले.
दोन तहसीलदारांचा अलर्ट
या १६ वर्षीय मुलीचा सुरुवातीला नेरमध्ये विवाह ठरताच तेथील तहसीलदार अमोल पोवार यांनी तातडीने जिल्हा बालसंरक्षण कक्षाला सूचना दिली. प्रशासनाला गुंगारा देऊन या मुलीचा विवाह घाटंजी तालुक्यात होत असताना तेथील तहसीलदार पूजा मोटोडे यांनी कक्षाला अलर्ट करून बालविवाह रोखला.