तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांना पालकांकडूनच कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:00 AM2021-05-17T05:00:00+5:302021-05-17T05:00:02+5:30
लहान मुलांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कोरोना स्वत:हून या मुलांपर्यंत पोहोचणार नाही. कारण मुले जवळपास वर्षभरापासून घरातच आहे. मात्र त्यांचे आई-वडील दररोज कामाच्या निमित्ताने घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे मुलांपर्यंत आई-वडिलांच्या माध्यमातूनच कोरोना पोहोचण्याचा धोका या तज्ज्ञांनी वर्तविला. मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यांच्या आई-बाबांनी स्वत: कोरोनामुक्त राहण्याची गरज आहे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्षभरापासून अडवता-अडवता कोरोना अनेकांच्या घरादारात शिरलाच. तरुणांपासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाने विळख्यात घेतले. आरोग्य व्यवस्थेने आतापर्यंत तरी छोट्या मुलांना कोरोनापासून सुरक्षित राखण्यात बऱ्याचअंशी यश मिळविले. परंतु कोरोनाची तिसरी लाट खास करून बालकांनाच धोकादायक ठरणार असल्याचे भाकित जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविले आहे. त्यामुळे आधीच आरोग्य व्यवस्था तोकडी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात या छोट्या पेशंटसाठी विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने यवतमाळातील बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेतले. लहान मुलांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कोरोना स्वत:हून या मुलांपर्यंत पोहोचणार नाही. कारण मुले जवळपास वर्षभरापासून घरातच आहे. मात्र त्यांचे आई-वडील दररोज कामाच्या निमित्ताने घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे मुलांपर्यंत आई-वडिलांच्या माध्यमातूनच कोरोना पोहोचण्याचा धोका या तज्ज्ञांनी वर्तविला. मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यांच्या आई-बाबांनी स्वत: कोरोनामुक्त राहण्याची गरज आहे. त्यांनी स्वत: कोरोना ॲप्रोप्रियेट बिहेवीअर ठेवणे आवश्यक आहे, असे येथील बालरोग तज्ज्ञ डाॅ. वीरेंद्र राठोड म्हणाले. बालकांमध्ये फार सिव्हीअर आजार होत नाही. पण आता कोरोनाचे नवनवे स्ट्रेन तयार होत असल्याने धोका वाढल्याचे त्यांनी सांगितले.
तर बालरोग तज्ज्ञ डाॅ. सारंग तारक म्हणाले की, तिसऱ्या लाटेतून सहीसलामत राहण्यासाठी मुलांनी सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क घालणे, हात धुणे महत्वाचे आहे. मात्र या गोष्टी बालवयामुळे त्यांना कळत नाही. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांना सतत घरात ठेवणे आवश्यक आहे. मोहोल्ल्यात खेळायला जावू देऊ नये. घरातल्या घरात बहीण-भाऊ असे दोघे-दोघे खेळले तर हरकत नाही. तिसऱ्या लाटेची तीव्रता किती असेल हे आताच सांगता येणार नाही. पण आपण काळजी घेतली नाही तर शासकीय यंत्रणा आणखी तोकडी पडू शकते.
मोठे लोकच घरात कोरोना नेत असतात. त्यामुळेच तिसऱ्या लाटेत मुलांना धोका होऊ शकतो. प्रत्येकाने कोरोनाची त्रिसूत्री अवलंबावी. सध्या फार थोडी मुले कोरोनाबाधित आढळली. त्यांना आपण सध्याच्याच वाॅर्डात उपचार देत आहोत. मात्र एक-दीड महिन्यातच मुलांसाठी नवीन वार्ड तयार केला जाईल. आजच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पाहणी करून सूचना केल्या. त्यानुसार प्रयत्न वाढवू.
- डाॅ.मिलिंद कांबळे
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क लावणे ही कोरोनाची त्रिसूत्री मुलांनीही पाळणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना धाेका असल्याचे डब्ल्यूएचओनेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आपण मुलांसाठी कोविडच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था सुरू केली आहे.
- डाॅ. तरंगतुषार वारे
जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ
मुलांच्या लसीकरणाबाबत गाईडलाईन येताच कार्यवाही केली जाईल. मुलांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने तिसरी लाट आली तरी मृत्यूचे प्रमाण फार कमी असेल, मात्र आपण गाफील राहून चालणार नाही. मुलांच्याही आधी पालकांनी कोरोना ॲप्रोप्रियेट बिहेवीअर पाळावे. कारण मुले तुमचे अनुकरण करतात.
-डाॅ. हरी पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी,
यवतमाळ.
बच्चे कंपनीतील कोरोनासाठी अशी असेल उपचार व्यवस्था
- मुले बाधित झालीच तर उपचार व्यवस्था सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या तयारीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.तरंगतुषार वारे यांनी स्पष्ट केले की, मुलांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. बाल कोरोना रुग्णांसाठी दोन बालरोग तज्ज्ञ जिल्हा रुग्णालयात आणले गेले आहे. मुलांचा स्वतंत्र कोविड वाॅर्ड करून ४० बेड राखीव ठेवले जातील. मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही लवकरच खरेदी केली जाईल. बालकांच्या व्यवस्थेबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक होणार आहे.
- जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. हरी पवार म्हणाले की, येथील महिला रुग्णालयात मुलांसाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांसाठी तालुकानिहाय कोविड सेंटर सुरू करता येईल का यासाठी जागेची पाहणी सुरू आहे.
१८ वर्षापासून पुढच्या वयोगटात लसीकरण सुरु झाले आहे. मात्र त्या खालील वयोगट लसीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा लहान मुलांनाच धोका होण्याची शक्यता आहे.
मास्क, सोशल डिस्टन्स या गोष्टी पाळण्याबाबत मुले जागृत असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना मोहोल्ल्यात खेळायला जावू देऊ नये, त्याऐवजी घरातल्या घरात भाऊ-बहीण असे दोघादोघांनी खेळावे.
अनेक पालकांमध्ये ‘प्रिअर प्रेशर’ असते. आपण कोरोनाची लस घेतली, त्यामुळे अपने को कुछ नही होता असे अनेकांना वाटते. मात्र लस घेतल्यावरही कोरोनाचा धोका संपत नाही. त्यामुळे लसीकरण झालेल्या आई-वडिलांनीही आपल्या मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
छोट्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोना झाला तरी बहुतांश मुले असिम्टमॅटीक असतील. असे असले तरी आपल्या मुलामध्ये थोडीजरी लक्षणे वाटली तरी लगेच त्यांना दवाखान्यात न्यावे.
मुलांबाबत आतापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुले १८ वर्षावरील आहे, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे तर १८वर्षाखालील मुलांनी कोरोनाची त्रिसूत्री पाळावी.