शाळेत बोलावून जेव्हा आई-बाबांचीच परीक्षा घेतली जाते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 12:55 PM2022-12-26T12:55:37+5:302022-12-26T12:59:05+5:30
मुलं बनले परीक्षक : घरोघरी अभ्यासाचे वातावरण निर्माण करणारा उपक्रम
अविनाश साबापुरे
यवतमाळ : खूप झाले खेळणे.. चल जरा अभ्यासाला बस..! अशा शब्दात पालक नेहमीच मुलांवर डाफरत असतात. पण मुलांच्या अभ्यासक्रमावर जेव्हा आई-बाबांचीच परीक्षा घेतली जाते, तेव्हा प्रौढांना कळते... बापरे आजकालच्या मुलांना कित्ती अभ्यास करावा लागतो राजेहो!!
...तर अशीच काहीसे चित्र जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाहायला मिळाले. सुटी असूनही शाळा खचाखच भरलेली. वर्ग तर भरलेलेच; पण व्हरांड्यातही गर्दी. सर्वत्र परीक्षेचा माहोल. पण परीक्षा देतोय कोण? मुलं नाही.. मुलं तर परीक्षकासारखे परीक्षा हाॅलमध्ये फेऱ्या मारताहेत. अन् परीक्षा देत आहेत त्यांचे बाबा आणि आई..! शहरी मुलांचे पालक जागृत असतात. पण खेड्यात एकदा मुलगा शाळेत गेल्यावर त्यांच्याकडे लक्ष द्यायला पालकांकडे फारसा वेळ नसतो. रोजमजुरी, शेतीची कामे यातच पालक गुरफटून जातात. हीच परिस्थिती ओळखून पालकांनाही मुलांच्या अभ्यासातले कळावे अन् त्यातून त्यांनी घरी मुलांचा अभ्यास घ्यावा, या उद्देशाने सुकळी गावातील जिल्हा परिषद शाळेने सुटीच्या दिवशी ‘आई-बाबांच्या परीक्षे’चा उपक्रम राबविला.
रोज शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या पालकांना विद्यार्थ्यांसारखे शाळेत बोलावण्यात आले. त्यांची चित्रकला परीक्षा घेण्यात आली. पण विषय गंभीर देण्यात आला.. ‘माझी आदर्श शाळा आणि माझी कलाकृती’ असा तो विषय होता. त्यात बाबालोकांनी आपापल्या मनातली शाळा रेखाटली. व्हारांड्यात बसून चित्रे काढण्यात मग्न असलेल्या ‘बाबां’च्या रांगेतून त्यांचीच मुलं लक्ष ठेवत फिरत होती. तर वर्गात विद्यार्थ्यांच्या माता विद्यार्थी होऊन बाकावर बसल्या होत्या. त्यांचा ५० गुणांचा पेपर घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी नुकताच दिलेला ‘महादीप परीक्षे’मधील प्रश्न, सामान्यज्ञानाचे प्रश्न, सामाजिकशास्त्र विषयातील प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले. यावेळी ‘आई’ छोटी निरागस मुलगी बनली होती. एकेक प्रश्न सोडविताना प्रत्येक आईचा कस लागत होता. कळंब तालुक्यातील या शाळेचे मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि सहायक शिक्षक संदीप कोल्हे यांनी या उपक्रमाला ‘माय जिनीयस मदर’ असे सार्थ नाव दिले. या परीक्षेत कुणाला किती गुण मिळाले हे महत्त्वाचे नाही. पण मुलांच्या प्रगतीसाठी आपणही ‘तयार’ असले पाहिजे, या भावनेतून हे ग्रामीण पालक परीक्षा देण्यासाठी आले. त्यामुळे सारेच पास !!