मुलांनो शाळेत या, नवे कोरे बूट घ्या ! ४४ लाख मुला-मुलींना मिळणार लाभ
By अविनाश साबापुरे | Published: April 29, 2024 07:58 AM2024-04-29T07:58:15+5:302024-04-29T07:58:46+5:30
यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : सरकारी शाळेत नवे शैक्षणिक सत्र सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेशासह नवेकोरे बूटही मोफत मिळणार आहेत. त्यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या बजेटमध्ये राज्य सरकारकडून भर घातली जाणार असून, शाळास्तरावर ही बूट खरेदी होईल.
यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु, राज्य सरकारने आता बूट आणि पायमोजे देण्याचीही तयारी केली आहे.
शासकीय शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ४४ लाख ६० हजार मुला-मुलींना हा लाभ मिळणार आहे. प्रतिविद्यार्थी एक जोडी बूट आणि दोन जोड्या पायमोजे मिळणार आहेत. या खरेदीसाठी प्रतिविद्यार्थी १७० रुपये असा दरही निश्चित झाला आहे. १५ जूनला उर्वरित महाराष्ट्रात व १ जुलै रोजी विदर्भातील शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशासह बूट देता यावेत, या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत.
अनुदानित शाळांना डच्चू
मोफत गणवेश आणि बुटांचा लाभ सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना दिला जाईल.
प्रत्यक्षात राज्यात ८५ हजार १०६ शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ कोटी २ लाख ६१ हजार ७० आहे.
त्यातील अनुदानित, विनानुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमधील ५८ लाख १ हजार ६६ विद्यार्थ्यांना या योजनेत स्थान नाही.