कोवळ्या हातून घडला अपराध... तरी शिक्षणासाठी मेहनत दिनरात.!

By अविनाश साबापुरे | Published: May 30, 2023 05:16 PM2023-05-30T17:16:06+5:302023-05-30T17:17:28+5:30

गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या निरीक्षणगृहातील मुलांनी उत्तीर्ण केली बारावीची परीक्षा

Children of observatory who were involved in serious crime passed their 12th examination | कोवळ्या हातून घडला अपराध... तरी शिक्षणासाठी मेहनत दिनरात.!

कोवळ्या हातून घडला अपराध... तरी शिक्षणासाठी मेहनत दिनरात.!

googlenewsNext

अविनाश साबापुरे

यवतमाळ : बारावीची परीक्षा अवघ्या चार दिवसांवर होती अन् ‘त्या’ मुलांच्या हातून गंभीर अपराध घडला... अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहाऐवजी निरीक्षणगृहात (ऑब्झर्वेशन होम) केली. पण निरीक्षणगृहाच्या संवेदनशील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी देण्याचा चंग बांधला. न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना रोज बंदोबस्तात परीक्षा केंद्रावर नेले. परत आणले. अभ्यास करवून घेतला. अन् या धडपडीचा परिपाक म्हणजे आज ही दोन्ही मुले बारावी उत्तीर्ण झालीत. शिक्षण भल्या-भल्यांना सुधारून टाकते... याही मुलांमध्ये बदल घडवेलच, ही आशा आता बळावली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा अपराध झाला. त्यात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते चौघेही अल्पवयीनच (विधिसंघर्षग्रस्त) असल्याने त्यांना निरीक्षणगृहात पाठविण्यात आले. त्यातील दोघांची बारावीची परीक्षा लगेच सुरू होणार होती. तर दोघांची दहावीची परीक्षाही सुरू होणार होती. त्यामुळे निरीक्षणगृहाने प्रयत्न सुरू केले. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने न्यायमूर्ती तथा बालन्याय मंडळाच्या अध्यक्ष सुप्रिया लाड यांनी या मुलांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

यातील एका मुलाने विज्ञान तर दुसऱ्याने कला शाखेतून परीक्षा दिली. त्यांना नियमित अभ्यास करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांचे मनोबल राखणे, मार्गदर्शन करणे, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, वेळप्रसंगी अभ्यासाकरिता स्वतंत्र व्यवस्था करणे यासाठी निरीक्षणगृहाचे अधीक्षक गजानन जुमळे हे जातीने लक्ष पुरवित होते. शिरावर खुनाचा गुन्हा असूनही निरीक्षणगृहातील सुधारणावादी वातावरणामुळे ही मुले बारावी परीक्षेत अनुक्रमे ५३ आणि ५६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालीत.

परीक्षेतील या यशाबद्दल जिल्हा महिला, बालविकास अधिकारी प्रशांत थोरात व बालन्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी सुप्रिया लाड सदस्या काजल कावरे, सदस्य राजू भगत, संस्थेचे अधीक्षक गजानन जुमळे, प. अधिकारी राजेंद्र गौरकार, समुपदेशक पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे, लिपिक सुनील हारगुडे, काळजी वाहक मंगेश वाघाडे, अविनाश राऊत, आकाश खांदवे, प्रतीक जुमळे यांनी संबंधित मुलांचे कौतुक केले.

परगावच्या परीक्षा केंद्रावर नेताना कसरत

बारावीसोबतच नंतर दहावीचीही परीक्षा सुरू झाली. त्यात उर्वरित दोन बालके बसणार असल्याने एकाच वेळेस चार बालकांना वेळेवर परीक्षेसाठी तयार करणे, यवतमाळातून परगावच्या परीक्षा केंद्रावर ने-आण करणे ही जबाबदारी निरीक्षणगृहाने पार पाडली. अपुरे मनुष्यबळ असताना व वाहनाची सुविधा नसताना ही जबाबदारी अत्यंत जिकिरीची होती. याही स्थितीत निरीक्षणगृहाच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक भावनेतून हे काम पूर्ण केले. शासनाने अशाप्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र अथवा विशेष बाब म्हणून स्थानिक परीक्षा केंद्रावर परवानगी देण्याची गरज निर्माण झाली आहे. परीक्षा केंद्र बाहेरगावी असल्याने या मुलांची ने-आण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. परंतु वाहन उपलब्ध झाले नाही. पण अधीक्षक गजानन जुमळे, समुपदेशक पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

संस्थेला वर्षभरापासून अनुदान उपलब्ध नसल्याने प्रवास खर्च अवघड असताना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, अविनाश पिसुर्डे व महेश हळदे यांच्या सहकार्याने बालन्याय मंडळाकडील उपलब्ध निधीतून तजवीज करण्यात आली. खासगी वाहन, महामंडळाच्या बसने ने-आण करण्याची व्यवस्था झाली. अनंत अडचणी असूनही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर या मुलांच्या परीक्षेचा मार्ग सोपा करण्यात आला अन् परीक्षेतील यश त्यांनी स्वत:च मिळविले.

Web Title: Children of observatory who were involved in serious crime passed their 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.