स्वातंत्र्यदिनी गावागावांत होणार बालहक्कांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:44 PM2019-08-13T12:44:16+5:302019-08-13T12:47:28+5:30
स्वातंत्र्यदिनी बालहक्कांचा गावागावात जागर केला जाणार आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संयुक्त राष्ट्रसंघाने बालहक्क करार करून अनेक वर्ष झाले. मत्र भारतासारख्या विकसनशील देशासह विकसित देशांनीही बालहक्कांकडे दुर्लक्ष केले आहे. आता २६ वर्ष उलटल्यानंतर भारताला या कराराची आठवण झाली असून केवळ खानापूर्ती म्हणून स्वातंत्र्यदिनी बालहक्कांचा गावागावात जागर केला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या करारानुसार मुलांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिले आहेत. जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकारी, विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार, कौटुंबिक व सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार आदींबाबत बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने विविध उपक्रम निश्चित केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने बालहक्काचा हा करार चक्क १९८९ मध्ये स्वीकारला. जगातील १९३ देशांनीही तो स्वीकारला आहे. तर भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी बालहक्क करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, सरकारने देशातील मुलांना आरोग्य सेवा, शिक्षण, कायदेशीर आणि सामाजिक सेवा पुरविणे बंधनकारक आहे. मात्र १९९२ ते १०१९ उजाडेपर्यंत सरकारला या कराराच्या अमलबजावणीची आठवण झाली नाही. आता अचानक शिक्षण सचिवांनी या कराराची जिल्हा परिषदांना आठवण करून दिली आहे.
येत्या स्वातंत्र्यदिनी विविध शाळा आणि गावांमध्ये कोणते उपक्रम राबवावे, याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. मात्र एक दिवस उपक्रम राबवून बालहक्क अबाधित राहतील का, याबाबत जाणकारांनी साशंकता व्यक्त केली आहे. केवळ भाषणबाजी करून नंतर हा बालहक्क करारा बासनात गुंडाळून ठेवला जाईल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
हे उपक्रम राबविले जाणार
ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत बालहक्क संरक्षणाचा ठराव घेणे बंधनकारक आहे. बालविवाहास प्रतिबंध करण्याबाबत ग्रामसभेत शपथ घेतली जाईल. शाळेच्या प्रभातफेरीत मुलांच्या हाती बालहक्क संरक्षणाचे फलक असतील. ध्वजारोहणावेळी मान्यवरांकडून बालहक्क संरक्षणाची शपथ घेतली जाईल. यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असेल. गावातील बालरक्षकांचा यावेळी सत्कार होईल.
करारानुसार, असे आहेत मुलांचे हक्क
जगण्याचा हक्क : यात जीविताचा, विकासाचा, समाधानकारक राहणीमान मिळविण्याचा, परिणामकारक आरोग्यसेवा मिळविण्याचा, अपंग बालकास स्वावलंबनाचा, सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार.
विकासाचा हक्क : मोफत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याचा अधिकार, सांस्कृतिक, कलात्मक कार्यक्रमात भाग घेण्याचा अधिकार.
संरक्षणाचा हक्क : घरापासून दूर असताना संरक्षणासाठी संघर्षाचा, कायद्याच्या कचाट्यात अडकल्यावर संरक्षणाचा अधिकार.
सहभागाचा हक्क : जीवनावर परिणाम करणाºया सर्व बाबींमध्ये भाग घेण्याचा अधिकार. स्वत:चा दृष्टिकोन इतरांना ऐकविण्याचा अधिकार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. सभा घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार.