चायना फवारणी पंप यवतमाळच्या बाजारातून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:30 PM2020-07-06T23:30:00+5:302020-07-06T23:30:02+5:30
यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चायना वस्तूंवर देशभर बहिष्काराचे वातावरण असतानाच यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
बहुप्रतीक्षेनंतर बरसलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे शेत शिवारात तणही वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशक खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. बाजारात तणनाशकच उपलब्ध नाही. फवारणीसाठी लागणारे स्प्रेपंप बाजारातून गायब झाले आहे. पूर्वी चायना हे पंप बनवत होते. याला पर्याय म्हणून असलेल्या भारतीय कंपन्या स्पर्धेत नव्हत्या. परिणामी बाजारात पंपाचाही तुटवडा पाहायला मिळत आहे.
खुल्या बाजारावर चायना स्प्रे-पंपने मार्केट काबिज केले. विक्रेत्यांनी हे चायना स्प्रे-पंप बाजारात आणले. जुन्या स्टॉकवरून या साहित्याची प्रारंभी विक्री झाली. आता या स्प्रे-पंपाचे स्पेअरपार्ट येण्याची प्रक्रिया थांबली आहे. याला पर्याय म्हणून असणारे भारतीय पंप मोजकेच आहेत. या पंपाचे साहित्य बाजारात उपलब्ध नाही. यामुळे बाजारात स्प्रे-पंपाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
स्प्रे-पंपाची बॅटरी वर्षभरात खराब होते. चायना पंपाच्या बॅटरीचा स्टॉक संपला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने स्प्रे-पंप खरेदी करावा लागत आहे. असे पंप बाजारात उपलब्ध नाही. यातून शेतकरी धास्तावले आहेत. फवारणीचे पंप मिळविण्यासाठी बाजारात गर्दी वाढली आहे.
तणनाशकाचाही तुटवडा
मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकºयांनी अलीकडच्या काळात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. यावर्षी तणनाशक निर्मिती कंपनीकडे मोजकाच स्टॉक आहे. यातून बाजारात तणनाशकाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकºयांना तणनाशक खरेदी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.