जिल्ह्यात चायनीज मांजावर पूर्णत: बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नायलॉनपासून बनलेला चायनीज मांजा सर्रासपणे बाजारात विक्रीला आहे. या मांजामुळे पशु-पक्षांसोबतच रस्त्याने ये-जा करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नायलॉनपासून बनलेला चायनीज मांजा सर्रासपणे बाजारात विक्रीला आहे. या मांजामुळे पशु-पक्षांसोबतच रस्त्याने ये-जा करताना अपघात घडत आहेत. या मांजामुळे कुणाच्या गळ्याला काच पडतो, तर कुणाचे हात, बोट कापले जातात. हा मांजा पर्यावरणासाठी घातक असून मानवालाही उपद्रवकारक ठरणारा आहे. त्यामुळे या मांजाच्या खरेदी-विक्रीवर जिल्ह्यात पूर्णत: बंदी आणावी, असा अर्ज जिल्हाधिकाºयांकडे आला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आदेश काढून थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या दिवसात बच्चे कंपनींसह प्रौढही पतंगीच्या स्पर्धा आयोजित करतात. सार्वत्रिकरित्या शहरात पतंग महोत्सव साजरा होतो. या पतंगांमध्ये सर्रास चायनीज मांजा वापरला जातो. यासाठी शहरातील प्रमुख विक्रेत्यांसह किरकोळ दुकानदारांकडेही चायनीज मांजाचा मोठा साठा आला आहे. हा चायनीज मांजा पर्यावरणासाठी घातक आहे. या मांजामुळे पक्षांचा बळी जातो. त्यांना आकाशात मुक्त संचार करता येत नाही. अनेक पक्षी गंभीररित्या जखमी होऊन कोसळतात. याचा परिणाम पशुपक्षांचे अस्तित्वच धोक्यात आणणारा आहे. त्यामुळे पक्षी प्रेमी व प्रर्यावरणप्रेमींनी चायनीज मांजाविरोधात वारंवार तक्रारीसुद्धा केल्या आहेत.
चायनीज मांजा लाऊन पतंगा उडवित असताना अनेकदा पेच लावले जातात. त्यामुळे हा मांजा तुटून रस्त्यावर व कुठेही लटकत असतो. दुचाकीवरून प्रवास करताना हा मांजा अडकल्याने गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. कित्येकजण तर दुचाकीवरून कोसळल्याचेही पहावयास मिळते. यात काहींचा मृत्यूही झाला आहे. बंदी असलेला हा मांजा रासरोसपणे शहरात विकला जातो. मध्यंतरी पोलीस खात्यातीलच एक-दोन कर्मचारी मांजामुळे जखमी झाल्यानंतर पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. मात्र दोन दुकानांच्या पुढे ही कारवाई सरकली नाही. शहर पोलिसांच्या हद्दीत बांगरनगर परिसरात मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. चायनीज मांजा हा नायलॉनपासून बनत असल्याने त्याची जखम खोलवर होते. पूर्वी पतंग उडविताना सूती धाग्याचा वापर केला जात होता. त्यापासूनच मांजाही तयार करण्यात येत होता. आता हा प्रकार पूर्णत: बंद झाला आहे. सुती धागा व मांजा मिळत नाही. त्याऐवजी नायलॉनपासून बनलेला चायनीज मांजा सर्रास वापरला जात आहे. या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार राजरोसपणे होतो. या गंभीर प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या अर्जावरूनच जिल्हाधिकाºयांनी आदेश काढले आहेत.
आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल व पोलीस यंत्रणा चायनीज मांजाविरोधात कोणती मोहीम उघडतात याकडे लक्ष लागले आहे. चायनीज मांजा विक्री करणे, खरेदी करणे आणि त्याचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. हा मांजा दिसल्यास जप्त करून कलम १४४ नुसार फौजदारी संहितेत कारवाई केली जाणार आहे. आता पतंगप्रेमींनी सुती धाग्यापासून बनलेला मांजा वापरावा. पर्यावरणाला हानीकारक असलेला चायनीज मांजा वापरू नये अन्यथा कारवाई निश्चित मानले जात आहे.
सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश
जिल्हाधिकाºयांनी या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी स्वतंत्र आदेश काढत यवतमाळ, वणी, दारव्हा, पुसद, राळेगाव, उमरखेड, केळापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना चायनीज मांजाविरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. इतकेच नव्हे तर यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निर्देश देण्यात आले आहे.