कळंब येथे चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:24 PM2019-01-28T22:24:58+5:302019-01-28T22:25:16+5:30
विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे.
५ फेब्रुवारीला श्री क्षेत्र कोटेश्वर येथे पूजा व अभिषेक, कलश पूजन, तीर्थस्थापना, ध्वजारोहण श्रींची पूजा व अभिषेक आदी कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.३० वाजता चिंतामणी देवस्थान येथे मुंगसाजी सेवाश्रम कोल्हापूर (सिंगारवाडी) येथील अमरानंद भारती यांचे प्रवचन होईल. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अमरानंद भारती यांचे प्रवचन होईल. ८ रोजी दुपारी १२ वाजता गणेश जन्म, श्री गणेश जन्माचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी महाआरतीच्या वेळी श्रींच्या कलशावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. करण्यात येणार आहे. ९ रोजी अमरानंद भारती यांचे प्रवचन, १० रोजी महारूद्र हनुमान मंदिराच्या प्रांगणात महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी गायत्री परिवारातर्फे विराट ज्ञान दीपयज्ञ आयोजित आहे.
११ फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन, दुपारी १ वाजता श्रींची द्वारयात्रा, मिरवणूक व सायंकाळी ५ वाजता दहिहांडी फोडली जाईल. १२ रोजी साई भजन होईल. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती व हरिपाठ, श्रींना महाभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, साग्रसंगीत नित्य आरती, प्रवचन, श्री गणेश पुराण वाचन, सामूहिक हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.
आंतरराज्यीय हास्यकविंचे संमेलन
१३ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘हास्य कविसंमेलन’ होणार आहे. यात आंतरराज्यीय हास्यकवी किरण जोशी, नम्रता नमिता (भोपाळ), डॉ.संतोष मुजुमदार (कोलकाता) व कपील बोरुंदिया सहभागी होतील. १४ ला सुधीर महाजन यांचे गीतरामायण, १५ रोजी प्रवीण तिखे यांचा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा विनोदी कार्यक्रम सायंकाळी ७.३० वाजता सादर होईल. १६ रोजी ‘नुपूर’ हा शास्त्रीय नृत्याविष्कार शिल्पा थेटे सादर करतील. १७ फेब्रुवारीला अरविंद भोंडे (अकोला) यांचा ‘कार्यक्रम असा की, पोटभर हसा’ हा मनोरंजनातून जनप्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.