‘चिंतामणी’चे विद्यमान विश्वत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:15 PM2018-01-12T22:15:08+5:302018-01-12T22:15:21+5:30
श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली.
गजानन अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गत अनेक महिन्यापासून विश्वतांच्या निवडीबाबात निर्माण झालेली अस्थिरता अखेर संपुष्टात आली आहे.
सहायक धर्मदाय आयुक्त पी.पी.चव्हाण यांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी चिंतामणी देवस्थान विश्वस्तांची निवड केली होती. दरम्यान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. परंतु ही याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर चेंज रिपोर्ट मंजुर करु नये, यासाठी देवस्थानचे माजी अध्यक्ष देविदास काळे, प्रा.उमेश क्षीरसागर, चिंतामण शेंडे, रमाकांत खसाळे, अनंत भिसे व राजेंद्र कठाळे यांनी आव्हान दिले. सहायक धर्मदाय आयुक्त जे.एम.चौहाण यांच्या कोर्टात सदर प्रकरण सुरु होते. त्यामुळे चेंज रिपोर्टचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या प्रकरणातही विद्यामान विश्वस्तांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे विश्वस्तांच्या निवडीवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले. देवस्थानच्यावतीने अॅड.उमेश बावणकर तर आक्षेप घेणाºया गटाची बाजू अँड.राजेश कदम व अँड पोहरे यांनी बाजू मांडली.
मागील अनेक वर्षापर्यंत येथील विश्वस्त निवडीचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. त्यामुळे देवस्थान प्रशासनाला ठोस विकासात्मक कामांना गती देता आली नाही. भाविकांच्या सुविधेकडेही दुर्लक्ष झाले. परंतु आता नवनियुक्त विश्वस्त मंडळ पूर्ण अधिकारारुढ झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उच्च न्यायालयानेही फेटाळली होती याचिका
तत्पूर्वी नवीन विश्वस्तांच्या निवडीनंतर लगेच आक्षेप नोंदवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तांची निवडप्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविली. ओळखीतील लोकांनाच विश्वस्त म्हणून स्थान दिले. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच रद्द करुन दोषींवर कारवाई करावी असा आक्षेप होता. माजी उपसरपंच विनोद काळे, भाजपाचे जिल्हा सचिव सुरेश महाजन, भाजप व्यापारी आघाडीचे प्र्रमुख विजय नवाडे, भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस सुरेश होरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अशोक गारगाटे यांनी ही याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयानेही विश्वतांच्या बाजूने निकाल दिला होता.