वडकीतील खुनाचा तपास सीआयडीकडे
By admin | Published: December 23, 2015 03:13 AM2015-12-23T03:13:30+5:302015-12-23T03:13:30+5:30
राळेगाव तालुक्याच्या वडकी पोलीस ठाणे हद्दीत वेडशी गावातील युवकाच्या खुनाचा तपास अखेर नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीआयडीकडे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) सोपविण्यात आला आहे.
हायकोर्ट : मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान
यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या वडकी पोलीस ठाणे हद्दीत वेडशी गावातील युवकाच्या खुनाचा तपास अखेर नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीआयडीकडे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) सोपविण्यात आला आहे. सोमवारी २१ डिसेंबर रोजी या संबंधीचे आदेश सीआयडीच्या अमरावती मुख्यालयात धडकले.
वडकी पोलीस ठाण्यात वेडशी येथील संजय पांडुरंग शिवाणे (२४) या युवकाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सन २०१४ मध्ये (अपराध नं.२८/२०१४) हे प्रकरण उजेडात आले होते. संजय बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून वडकी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हाही नोंदविला गेला. मात्र संजयचा मृत्यू नेमका कशामुळे हे अखेरपर्यंत स्पष्ट झाले नाही. त्याच्या पोटात विष, अल्कोहोल आढळून आल्याने पोलीस संभ्रमात होते. घटनेच्या एक महिन्यानंतर खुनाची तक्रार पोलिसात नोंदविली गेली. मृतक संजयवर वडकी पोलीस ठाण्यातच भादंवि ५०९ कलमान्वये गुन्हाही नोंदविला गेला. ६ जून २०१४ पर्यंत तत्कालीन ठाणेदार राजपूत व नंतर विद्यमान ठाणेदार अमोल माळवे यांनी या प्रकरणाचा तपास केला. उच्च न्यायालयानेसुद्धा तपासासाठी काही मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश वडकी पोलिसांना दिले होते. त्यानुसार सखोल तपास केला गेला. पोलीस ठोस निष्कर्षाप्रत पोहचून आरोपीच्या अटकेची तयारी करीत असतानाच अखेर संजय शिवाणे याच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या आदेशावरून सीआयडीकडे सोपविला गेला. सीआयडीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक एस.टी. खाटके हे या गुन्ह्याचा तपास करणार आहे.
दोन वर्षांपासून मंजुरी नाही
स्थानिक पाटबंधारे विभागातील एका बोगस जाहिरात व कंत्राट प्रकरणात दोन अभियंते व एका लिपिकाविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याची तयारी सीआयडीने केली आहे. मात्र त्यासाठी त्यांना शासनाची परवानगी हवी आहे. नोव्हेंबर २०१३ पासून सीआयडीचा शासनाकडे प्रस्ताव असून अद्यापही ही परवानगी मिळालेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
आरटीओ बोगस पासिंगसह नऊ गुन्ह्यांचा तपास
यवतमाळ सीआयडीकडे तपासाला आलेल्या गुन्ह्यांची संख्या आता नऊ झाली आहे. मात्र येथे पूर्णवेळ अधिकारीच तपासासाठी उपलब्ध नाही. एस.टी. खाटके यांची अमरावतीत नेमणूक असून यवतमाळचा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. आरटीओतील ३८ ट्रकचा बोगस पासिंग घोटाळा, घाटंजीतील ग्रामसेवकाचा खून, कारेगावच्या पोलीस पाटलाचा खून अशी काही आव्हानात्मक प्रकरणे सीआयडीकडे आहेत. आर्यरुप टुरिझमविरुद्ध घाटंजी व पुसदमध्ये दाखल झालेले गुन्हे पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहे. आरटीओच्या बोगस ट्रक पासिंग घोटाळ्याच्या दोषारोपपत्रात पुणे मुख्यालयातून सतत त्रुट्या काढल्या जात आहे. यावरून हा तपास परिपूर्ण झाला नसल्याचे दिसून येते.