मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:05 PM2018-05-19T23:05:38+5:302018-05-19T23:05:38+5:30
विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/पुसद : विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार अनिलसिंंह गौतम यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) सोपविल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुसद येथील आंबेडकर वार्डातील भीमा तुकाराम हाटे याच्या मृत्यूनंतर पुसदमध्ये तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी सायंकाळी दगडफेक झाली. त्याचा मृतदेह पुसद शहरात दाखल होताच नातेवाईकांनी तो शहर ठाण्याच्या प्रवेशव्दारावर ठेवला. ठाणेदारावर कठोर कारवाईचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. काहींनी शहरात फिरून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठ शनिवारी कडकडीत बंद होती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पुसद गाठून या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या चौकशी अहवालावरून ठाणेदार अनिलसिंह गौतम यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याचे पत्रही त्यांनी हाटे यांच्या नातेवाईकांच्या सुपूूर्द केले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक उपस्थित होते. तूर्तास याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. ठाणेदाराच्या निलंबनाचा आदेश व तपास सीआयडीकडे देण्यात आल्याच्या आदेशाची प्रत घेतल्यानंतर भीमा हाटे याच्या नातेवाईकांनी त्याचे पार्थिव उचलून त्यावर अत्यंसंस्कार केले. या घटनेमुळे शुक्रवारी रात्रीपासून पुसद शहर ठाणे परिसरात तणावाची स्थिती होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी व त्यांचे पथक पुसदमध्ये तळ ठोकून होते.
वडिलांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ठाणेदार गौतमसह चार शिपायांनी भीमा हाटे याला पट्यांनी, लाथाबुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार मृताचे वडील तुकाराम हाटे यांनी मुख्यमंत्र्यासह पोलीस अधीक्षक, आमदार मनोहरराव नाईक यांच्याकडे केली. ३० एप्रिल रोजी जामिनीवर सुटल्यानंतर ५ मे रोजी भीमाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. नंतर ७ मे रोजी सावंगी (मेघे) येथे नेले. दरम्यान, १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. आमदार मनोहरराव नाईक, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, डीवायएसपी अजयकुमार बंसल, ठाणेदार धनंजय सायरे, तहसीलदार डॉ. संजय गरकाल आदींनी भीमाच्या नातेवाईकांची समजूत काढली.