सिनेमागृह व्यावसायिकांना पावणेपाच कोटींच्या आर्थिक नुकसानीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:00 AM2020-11-11T05:00:00+5:302020-11-11T05:00:02+5:30
सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे यवतमाळातील दोन टॉकीज व एक मल्टीप्लेक्स बंद आहे. येथे नऊ महिन्यापासून लागलेले कुलूप दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. अजूनही कोणत्याच टॉकीजमध्ये सिनेमाचा शो ऑन झाला नाही. सिनेमागृह साफसूफ करण्याचे काम सुरू आहे. टॉकीजवर कार्यरत स्टाफही नऊ महिन्यांपासून बंद असल्याने मालकांना त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे. या उलट टॉकीज चालविण्याचा खर्च दुप्पट झाला आहे. प्रेक्षकांना भावणारे चित्रपट नसल्याने दिवाळीच्या सुटीतही प्रेक्षक सिनेमागृहाकडे येतील की नाही याची साशंकता आहे. जुने चित्रपट टॉकीजमध्ये येवून पाहणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे टॉकीज व्यावसायिकांचेही अद्याप तळ्यातमळ्यात सुरू आहे.
सिनेमागृहात काय काळजी घेतली जाते?
यवतमाळात दोन जुन्या टॉकीज व एक मल्टीप्लेक्स आहे. या ठिकाणी एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्केच तिकीटांची विक्री केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मधातली खुर्ची रिकामी ठेवली जात आहे. शिवाय सॅनिटायझर आणि शो संपल्यानंतर निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याचे नियोजन येथे केले आहे.
यंदाच्या दिवाळीत सिनेमा दाखविण्याचाच प्रश्न
नवे सिनेमे नसल्याने दिवाळीत दाखवायचे काय, असा प्रश्न टॉकीज चालकांना आहे. त्यात युपोचा खर्च टॉकीज चालकावर लादला जात आहे. प्रोड्युसरकडून सवलत मिळण्याची गरज आहे. युपोचे भाडे कमी केले तरच डिस्ट्रीब्युटर व टॉकीज चालक यांना काही तरी करता येणार आहे. अशी स्थिती निर्माण झाली आहे.
टॉकीज व मल्टीप्लेक्स चालक पुरते बरबाद झाले आहे. नऊ महिन्यानंतर थिएटर सुरू करावे तर नव्या चित्रपटांची समस्या आहे. जुने सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक येतील काय याची साशंकता आहे. शिवाय अनेक महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह सुरू करण्यावरच मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडात भर पडत आहे.
- विलिन इंगळेकर,
मल्टीप्लेक्स चालक
आठवड्यातून एकदा चित्रपट बघत होतो. कोरोना संकटामुळे नऊ महिन्यांपासून सिनेमागृहात जावून चित्रपट बघितला नाही. आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये ती संधी आहे. तर बिग बजेटचे चित्रपट रिलिज झालेले नाहीत. सिनेमागृहाकडे आकर्षित करतील असे चित्रपट यावर्षी आलेच नाहीत. त्याची प्रतीक्षा आहे.
- प्रतीक पवार, यवतमाळ