वीज अभियंत्यांना घेराव
By admin | Published: June 28, 2017 12:35 AM2017-06-28T00:35:32+5:302017-06-28T00:35:32+5:30
मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी मंगळवारी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर
विजेचा लपंडाव : दोन महिन्यांपासून खेळखंडोबा, आर्णीत तीन तास ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी मंगळवारी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर धडक देवून तब्बल तीन तास वीज अभियंत्यांना घेराव घातला. सुकळीसह देऊरवाडी, पाभळ, पिंपळनेर, बोरगाव दाभडी, चिकणी येथील ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे. पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही समस्या विद्युत कंपनीच्या संबंधितांकडे वारंवार मांडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी कार्यालयावर धडक दिली.
उपकार्यकारी अभियंता पी.बी. मोहोकार यांना घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, पंचायत समिती सदस्य रवी राठोड, सुकळीचे सरपंच सुभाष जाधव, नगरसेवक चिराग शहा आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. पाभळ येथील दिलीप राठोड, पिंपळनेरचे सरपंच प्रमोद आडे यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या गावातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग यांनी विद्युत कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क केला. सदर गावातील विजेची समस्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. उपकार्यकारी अभियंता मोहोकार यांनीही अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क करून प्रश्न मांडला. यानंतर आर्णी शहरासह सुकळी व परिसरातील वीज पुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.