दूषित पाण्यामुळे नागरिक धास्तावले

By Admin | Published: April 16, 2017 01:03 AM2017-04-16T01:03:12+5:302017-04-16T01:03:12+5:30

शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

Citizens are afraid of contaminated water | दूषित पाण्यामुळे नागरिक धास्तावले

दूषित पाण्यामुळे नागरिक धास्तावले

googlenewsNext

नाल्यांतून पाईप लाईन : गटारात कॉक, शौचालयालगत लिकेज, डायरियाचा धोका वाढला
शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पाईप लाईन जागोजागी फुटल्याने त्यातून चक्क गटारांतील पाणी नळांव्दारे घरोघरी पोहोचत आहे. काही ठिकाणी कॉक असे गटारात गटांगळ्या खात आहे. याकडे जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
शहरात पाणीपुरवठ्यासाठी प्राधिकरणाने ३० हजार नळ जोडण्या दिल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी शहराच्या विविध भागात पाईप लाईन टाकली. मात्र ती जीर्ण होऊन जागोजागी फुटली. अनेक ठिकाणी प्रचंड मोठे भगदाडच पडले. काही ठिकाणी पाईप लाईनवरच नाल्या आहेत. त्यातील सांडपाणी पाईप लाईनमध्ये शिरते. तेच पाणी नागरिकांना पोहोचविले जात आहे.
ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असतो, त्या दिवशी सांडपाणी वहेच्या दाबाने पाईप लाईनमध्ये ओढले जाते. दुसऱ्या दिवशी नळ आल्यानंतर तेच दूषित पाणी विविध भागात पोहोचते. यामुळे शहरात सर्वत्र दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत आहे. हा प्रकार गेलया अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र अद्याप जीवन प्राधिकरणाने त्याची दखल घेतली नाही. आत्ताही अनेक ठिकाणी गटारांमध्ये फुटलेल्या पाईप लाईन तशाच पाणीपुरवठा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या सर्व पाईप लाईनचे कॉक गटारांच्या शेजारीच बसविण्यात आले आहेत. तो कॉक सुरू केल्यानंतर संबंधित भागात पाणीपुरवठा सुरू होतो. कॉक सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बाब माहिती आहे. मात्र याबाबतची सूचना ते कधीच प्राधिकरणाच्या वरिष्ठांना देत नाहीत का, असा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी बाजूला सारत ते कॉक सुरू करतात. सांडपाण्यातूनच त्यांना जावे लागते. तरीही ते उपाययोजनांबाबत प्राधिकरणाला माहिती देत नाही.
शहरातील अनेक ठिकाणी आता कॉकजवळ गटारे तयार झाली आहे. तेथे पाणी साचत आहे. त्यात आता अळ्या, पॉलीथीन व शेवाळ दिसून येत आहे. या गटारगंगेतील पाणी पाईप लाईनमधून घरांपर्यंत पोहोचत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरातील आबालवृद्धांचे आरोग्य ध,क्यात सापडले आहे. डायरियासारख्या मोठ्या साथीचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. तूर्तास अनेक नागरिकांना पोटदुखी, उलटी, हगवणीसारख्या आजारांना भंडावून सोडले आहे. यातून मोठी साथ निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

लिकेज असल्याचे कबूल
प्राधिकरणाने शहरात ठिकठिकाणी पाईप लाईनमध्ये लिकेज असल्याचे कबूल केले आहे. १९७२ मध्ये टाकण्यात आलेल्या पाईप लाईनमुळे अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तक्रार झाल्यानंतर दुरूस्ती केली जाते, अशी मखलाशीही केली. आता संपूर्ण पाईप लाईन बदलावी लागणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. आता ‘अमृत’मधून मोठी नवीन पाईल लाईन टाकणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. मात्र त्यासाठी नेमका किती कलावधी लागेल, हे अद्याप कोडेच आहे.

अंडरग्राउंड पाईप फुटले
सराफा लाईनमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सर्व नाल्या अंडरग्राउंड आहे. त्यातूनच पाणीपुरवठ्याची पाईप लाईन गेली आहे. ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. परिणामी या परिसरात पाणी पुरवठा होताना चक्क नालीच आधी धो-धो वाहते. फुटलेल्या पाईप लाईनमधून गटाराचे पाणीही लोकांच्या घरापर्यंत पोहोचते. वंजारीफैल परिसरात तर सार्वजनिक शौचालयालगतच पाईप लाईन फुटली आहे. त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसरातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

शिवाजी गार्डन परिसरात सांडपाणी
शिवाजी गार्डनचा परिसरही वर्दळीचा आहे. तेथून सांडपाण्याची मोठी नाली गेली आहे. त्या बाजूलाच नळाचा कॉक आहे. पाणी पुरवठ्याच्या त्यातून शेकडो लिटर पाणी वाहते. पाण्याा प्रचंड अपव्यय होतो. इतर दिवशी गटारातील पाणी कॉकमध्ये शिरते. त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो.

निळोण्याने तळ गाठल्याने पाणी गढूळ-अभियंता बेले
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सचिन बेले यांनी यवतमाळ शहराला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची स्पष्ट कबुली ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेले म्हणाले, निळोणा धरणामध्ये आता केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे अखेरचे पाणी असल्याने ते गढूळ येत आहे. त्यातच शहरातील पाईप लाईन ही १९७२ ची अर्थात ४४ वर्षे जुनी असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यातून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी शहराच्या वेगवेगळ्या भागातून नेहमीच येतात. शेवटच्या टप्प्यातील पाणीसाठा असल्याने त्यावर प्रक्रिया करूनच पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन व चुन्याच्या निवळीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गढूळ पाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन उपाययोजना केली जात आहे. मात्र ३०३ कोटींची अमृत योजना कार्यान्वित झाल्यानंतरच शहराची या समस्येतून सुटका होण्याची शक्यताही अभियंता बेले यांनी वर्तविली.

आर्णी मार्गावर साचले गटार
येथील बसस्थानकाकडून आर्णीकडे जाणारा मार्ग सर्वाधिक वर्दळीचा आहे. या मार्गावर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विविध दुकाने आहेत. तेथेच एक अन्नपदार्थाचेही दुकान आहे. या दुकानालगतच पाणीपुरवठ्याचा कॉक आहे. तेथे नळ सुरू होताच गटार साचते. सर्वत्र पाणी वाहते. दुकानदार त्त्यातच अंड्यांची टरफले फेकतात. त्यामुळे या गटारात अळ्या पडल्या आहेत. शेवाळही वाढले आहे. त्यामुळे लगतच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाण्याचा अपव्यय
पाण्याचा जपून वापर करण्याचे अवाहन करणाऱ्या प्राधिकरणाच्याच बुडाखाली अंधार आहे. लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईप लाईन फुटल्याने व लिकेजमुळे अनेक घरी नळांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अनेकांनी यामुळे चक्क टील्लू पंप बसवून पाणी ओढणे सुरू केले. दुसरीकडे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. प्राधिकरणाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Citizens are afraid of contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.