बोरगावातील नागरिकांची ग्रामपंचायतीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:08 PM2018-04-21T22:08:53+5:302018-04-21T22:08:53+5:30
पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बोरगाव(लिंगा) येथील नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. सकाळी सरपंच नंदा बागडे, सदस्य प्रवीण आडे, विनोद ढोकळे, ग्रामसेवक प्रशांत बोचरे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत दोन तास कोंडून आपला राग व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बोरगाव(लिंगा) येथील नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. सकाळी सरपंच नंदा बागडे, सदस्य प्रवीण आडे, विनोद ढोकळे, ग्रामसेवक प्रशांत बोचरे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत दोन तास कोंडून आपला राग व्यक्त केला.
मार्च महिन्यापासून बोरगावसह सोनखास हेटी, घुई, उत्तरवाढोणा, कामनदेव, सोनवाढोणा आदी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे दिलेले टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहे. गावातील हातपंप, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. डोक्यावर, सायकलने, बैलबंडी आदी साधनांद्वारे गावाबाहेरच्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. रात्रीच्यावेळी पाणी भरताना वन्यजीवांपासून धोका होण्याची भीती आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष आहे.
परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. नाला खोलीकरण, सरळीकरण, रूंदीकरण आदी कामे घेण्यात आली. निकृष्ट झालेल्या कामांमुळे या अभियानाची वाट लागली. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उपाययोजना व्हाव्या, यासाठी बोरगाव(लिंगा) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. पदाधिकारी आणि कर्मचाºयांना धारेवर धरले.