वणीत विकृत मुलाला दिला नागरिकांनी चोप
By admin | Published: August 14, 2016 12:47 AM2016-08-14T00:47:34+5:302016-08-14T00:47:34+5:30
विकृत मानसिकतेतून मनुष्य कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. त्याच्या या विकृतीचा बळी मुके जनावरही ठरू शकते.
वणी : विकृत मानसिकतेतून मनुष्य कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. त्याच्या या विकृतीचा बळी मुके जनावरही ठरू शकते. याचा प्रत्यय वणी येथील यात्रा मैदान परिसरात झालेल्या प्रकारातून आला. एका विकृत मुलाने उत्तेजना शमविण्यासाठी थेट बकरीलाच लक्ष्य केले. प्रकरण तिथेच थांबविण्यासाठी बकरी मालकाने १० हजारांची मागणी केली. मात्र ८०० रुपयांवर प्रकरण थांबले.
स्थानिक जत्रा मैैदान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून एक कुटुंब वास्तव्याला होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास याच कुटुंबातील एका १४ वर्षीय मुलाने मैदानात भटकत असलेल्या एका बकरीसोबत अतिशय किळसवाणा व मेंदूला झिणझिण्या आणणारा प्रकार सुरू केला. परिसरातील काही महिलांच्या नजरेत हा प्रकार पडला. या महिलांनी लगेच याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती दिली. बकरीच्या मालकापर्यंतदेखील ही माहिती पोहोचली. लगेच बकरी मालकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे उपस्थित काही नागरिक व बकरी मालकाने प्रथम त्या मुलाला चांगलाच चोप दिला. प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याची तयारी बकरी मालकाने दाखविताच, मुलाच्या आई-वडिलांनी हातपाय जोडणे सुरू केले. मुलाच्या कृत्याने बकरीच्या पोटातील गर्भाला नुकसान पोहोचले. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी भूमिका बकरी मालकाने घेतली. मुलाच्या आई-वडिलांनी ८०० रुपये दिले. नंतर बकरी मालक व नागरिकांनी या कुटुंबाला हुसकावून लावले. यासंदर्भात वणी ठाण्याचे निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांना विचारणा केली असता, आपल्याला काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)