‘मजीप्रा’पुढे नागरिक हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:00 AM2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:13+5:30
पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांशी या विभागाला काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या कार्यालयात बहुतांशवेळा शुकशुकाट राहात असल्याने नेमके भेटायचे कुणाला हा प्रश्न निर्माण होतो. संपूर्ण कारभार जणू कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोडून देण्यात आला आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी होत आहे.
पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.
पाण्याचे देयक दोन महिन्याचे दिले जाते. यासाठी मीटरचे रिडींगही घेतले जात नाही. मनठोक युनीट नोंदवून ग्राहकांच्या हाती हजारो रुपयांचे बिल टाकले जाते. अनेक भागात तर ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ या दोन महिन्याचे देयक नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले आहे. पाणी वापराचे युनीटही दिशाभूल करणारे आहे. बील भरण्याची तारीख अगदी आठ दिवसांवर असताना देयक पाठविले जाते. या बिलाचा भरणा करत नाही तोच पुढील महिन्याचे देयक तयार होते. त्यात मागील थकीत रक्कम दाखवून हजारो रुपयांचे बिल माथी मारले जाते. यातही गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. ग्राहकांना सहज समजेल अशा नोंदी दिल्या जात नाही. समजावून घेण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक बाबी पुढे करून गोंधळात टाकले जाते.
या कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांना लोकांचे फोनही उचलण्याची अॅलर्जी आहे. मांडलेली समस्या त्यांच्याकडून अपवादानेही सोडविली जात नाही. काही अधिकारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. विचारलेल्या माहितीची वास्तव स्थिती त्यांच्याकडे राहात नाही. प्रामुख्याने तांत्रिक कामे सांभाळणाºयांना हा आजार जडलेला आहे. अनेक भागात नव्यानेच टाकलेल्या पाईपलाईनवर लिकेज आहे. वॉलमनला या बाबी दिसत असतानाही दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय सुरू आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
नवीन लाईनवर जोडण्या कशा घेणार
अमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात नवीन अंतर्गत पाईपलाईन टाकल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जात आहे. याच आधारे जुने कनेक्शन नवीन लाईनवर टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. लाईन न बदलविल्यास पाणी पुरवठा थांबेल, अशी धमकीवजा सूचनाही देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेक भागात नवीन पाईपलाईनच पोहोचलेली नाही. अशावेळी कनेक्शन बदलविणार कसे हा नळधारकांचा प्रश्न आहे.