शहर विकासाचा आराखडा मंजुरीला; प्रक्षेपित लोकसंख्येसाठी तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:13 IST2025-02-17T18:13:07+5:302025-02-17T18:13:38+5:30
२०४७ पर्यंतचे नियोजन : मंजुरीची लागली प्रतीक्षा

City development plan approved; Provision for projected population
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या विकासाचे भविष्यातील नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. यापूर्वी ८ जुलै १९९८ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेने विकास आराखडा तयार केला होता. साधारणः २० वर्षांनंतर नवीन आराखडा तयार केला जातो. आताचा आराखडा तयार करताना २०४७ पर्यंतचे नियोजन त्यात करण्यात आले आहे. यवतमाळ शहराची २०१६ मध्ये हद्दवाढ झाली. मोठा परिसर शहरात आला. त्यानुसार हा आराखडा तयार झाला आहे.
पूर्वीच्या यवतमाळ शहरापेक्षा आता क्षेत्रफळ वाढले आहे. हद्दवाढीत पिंपळगाव, वाघापूर, डोळंबा, भोसा, उमरसरा, मोहा, लोहारा (एमआयडीसी वगळून), वडगाव आणि यवतमाळ ग्रामीण असा परिसर नगरपरिषदेत समाविष्ट झाला.
पूर्वीची मूळनगरपरिषद आणि वाढीव हद्द असा संयुक्त विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन रचना अधिनयम १९६६ च्या तरतुदीनुसार तयार करण्यात आला. या संभाव्य आराखड्यावर नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. त्यासाठी हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. २१० आक्षेप आराखड्यावर दाखल झाले. सुनावणी घेऊन समितीने आक्षेपाचे निराकरण केले. आता समितीचा अहवाल तयार झाल्यानंतर नगरपरिषदेने निर्णय घेऊन विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया केली आहे.
८,१५६ हेक्टर क्षेत्रफळाचा 'डीपीआर'मध्ये समावेश
हद्दवाढीनंतर शहर विकासासाठी आराखडा तयार केला आहे. त्याला अजून मंजुरी मिळणे बाकी आहे.
५,२५७.२१ हेक्टर क्षेत्र विकसित
शहराच्या नव्या विकास आराखड्यात ८ हजार १५६.०१ हेक्टर क्षेत्र दाखविण्यात आले आहे. यापैकी पाच हजार २५७.२१ हेक्टर भाग विकसित आहे. तर दोन हजार ८९८.८ हेक्टर परिसर अविकसित आहे. शहराचा ३५.५४ टक्के भाग अविकसित आहे. हे सर्व विचारात घेऊनच नवा आराखडा तयार करण्यात आला. यात रहिवास क्षेत्र, रस्ते, शाळा, दवाखाने, क्रीडांगण अशा अनेक सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी जागेचे आरक्षणही दिले आहे.
प्रक्षेपित लोकसंख्येचे असे आकडे
२०३७ पर्यंत शहराची प्रक्षेपित लोकसंख्या तीन लाख ८० हजार तर २०४७ पर्यंत चार लाख ५० हजार प्रक्षेपित लोकसंख्येचे शहर होईल असे पत्र नगर रचना
सहसंचालक यांच्याकडून २०२१ मध्ये मिळाले. त्या आधारावरच विकास आराखडाप्रारूप तयार करून प्रसिद्ध केले. आता ते मंजुरीसाठी आहे. नव्या पाठविण्यात येणार आराखड्यानुसार पुढील विकास कामाचे नियोजन केले जाणार आहे.