पाण्याच्या टँकरवर नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:20 PM2018-04-01T21:20:04+5:302018-04-01T21:20:04+5:30

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...

Civic scales on water tankers | पाण्याच्या टँकरवर नागरिकांची झुंबड

पाण्याच्या टँकरवर नागरिकांची झुंबड

Next
ठळक मुद्देटंचाई स्फोटक टप्प्यावर : सहा माणसांच्या कुटुंबाला मिळते फक्त एक ड्रम

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...

रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर पाण्याच्या एकेका थेंबासाठी चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. एका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. पाटीपुऱ्यांतील अंबिकानगर, राजारामनगर, अण्णाभाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौकात पाण्यासाठी हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. या भागातील बहुतांश नागरिक रोजमजुरी आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. पाणीटंचाईने त्यांच्या व्यवसायावरच पाणी फेरल्या जाण्याची वेळ आली आहे. किमान आठ दिवसांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या भागात अनेक कुटुंबांना एक दिवसाची सुटी घेणे भाग पडत आहे. नाहीतर पाणीच मिळत नाही. यामुळे ज्या दिवशी टँकर येणार, त्या दिवशी या भागातले नागरिक घराबाहेर, चौकात टाक्या आणून ठेवतात. टँकरवर पाळत ठेवतात. टँकर येताच पाणी भरण्यासाठी अक्षरश: यात्रा असते.
अंबिकानगरात महिनाभर प्रतीक्षा
प्रतिक वानखडे यांनी अंबिकानगरात गत महिनाभरापासून नळ नसल्याचा संताप नोंदविला. यामुळे इतर काम सोडून पाण्यासाठी हापशीवर जावे लागत असल्याचे ते म्हणाले. या भागात दोन हापशा आहेत. यातील एक कोरडी पडली आहे. तर दुसरीला पाण्यासाठी खूप पंप मारावे लागतात. त्याच्या दुरूस्तीकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.
आरती घोडाम याच भागातील विशाखा बुद्धविहार परिसरात राहतात. त्या ज्या ठिकाणी भाड्याने राहतात, ते घरमालक आठवड्यातून एक दिवस पाणी देतात. इतर दिवसात पाण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. यामुळे पाण्यासाठी सुटी घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.
याच भागातल्या पुष्पा उरकुडे यांनी हापसीमुळेच आम्ही जगतोय, अशी व्यथा मांडली. या भागात इतरत्र पाणी नाही. टँकरही येत नाही. अशा स्थितीत वापर कसा करावा, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.
सूरज डोंगरे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. दिवसभर भाजी विकल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते. यामुळे भाजी व्यवसायही प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात टँकर मिळाला असता तर आम्हाला रोजंदारी बुडण्याची भीती राहिली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजारामनगराची टँकरवरच भिस्त
राजारामनगरातील द्वारका वाघमारे, मीना ताकतोडे, शारदा खंडारे, करूणा वानखडे म्हणाल्या, आमचा भाग केवळ टँकरवर अवलंबून आहे. पाणीटंचाईवर टँकर हा पर्याय नाही. कारण मोजकेच पाणी मिळते. त्यावर काम कसं भागणार?, टँकरची वाट पाहत अख्खा दिवस जातो. यासाठी रोजमजुरी सोडावी लागते. ज्या ठिकाणावरून टँकर भरून येतो, त्या ठिकाणी पाणी तळाला गेले आहे. यामुळे १५ दिवसात स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटत आहे.
पाटीपुऱ्यात १९७३ च्या दुष्काळाची आठवण
पाटीपुºयातील प्रभाग आठमधील प्रमोद पाटील यांनी महिनाभरापासून आमच्या भागाकडे नळ नाही अशी खंत मांडली. दररोजच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागते. १०० ते १२० रूपये ड्रम पाणी विकत घ्यावे लागते, असे ते म्हणाले. टंचाईने १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून दिल्याचे सचिन मेश्राम, नरेश अढावे, वसंतराव मेश्राम म्हणाले. १४ एप्रिलनंतर काही कुटुंबीय बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याचे प्रमोद पाटील म्हणाले. या भागात पाण्याच्या चोºया होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. यामुळे ड्रमला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. सारिका कळने, वैशाली कळने, इंदू कांबळे, वर्षा तेलंगे, सिंधू कळने, सविता डोंगरे यांनी महिलांना कसरत करावी लागत असल्याचे सांगितले.

Web Title: Civic scales on water tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी