दहावीच्या विद्यार्थिनींनी परीक्षेचा धसका घेऊन सोडले घर, पोलिसांनी ७२ तासात शोधले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:01 PM2020-02-20T22:01:24+5:302020-02-20T22:02:07+5:30
यवतमाळातील आर्णी मार्गावर असलेल्या एका विद्यालयातील दोन वर्ग मैत्रिणी अचानकपणे शाळेतून घरी न जाता बाहेरगावी निघून गेल्या.
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ : शालेय जीवनात दहावीच्या परीक्षेला पालकांकडून महत्व दिले जाते. शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉर्इंट म्हणून या परीक्षेकडे पाहण्यात येते. त्यामुळे पालक वर्ग दहावीत असलेल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेऊन अभ्यास करण्याबाबत पाठपुरावा घेत असतात. अशाच सजग पालकांनी मुलींच्या अभ्यासातील परफॉर्मन्सवरून त्यांची कानउघाडणी केली. यामुळे धास्तावलेल्या मुलींनी थेट शाळेतूनच पलायन केले. सुदैवाने अवधूतवाडी पोलिसांना मुली शोधण्यात ७२ तासातच यश मिळाले.
यवतमाळातील आर्णी मार्गावर असलेल्या एका विद्यालयातील दोन वर्ग मैत्रिणी अचानकपणे शाळेतून घरी न जाता बाहेरगावी निघून गेल्या. ही घटना १७ फेब्रुवारीला घडली. मुली वेळेत घरी न आल्याने पालकांची चिंता वाढली. इतरत्र शोध घेतला. मात्र मुली मिळून आल्या नाही. शेवटी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलींच्या पालकांनी आपल्या मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ठाणेदार आनंद वागतकर यांना निर्देश दिले.
वागतकर यांनी स्वतंत्र शोध पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक अलका गायकवाड यांच्या नेतृत्वात शैलेष जाधव, सुधीर पुसदकर, सागर चिरडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला या मुली कळंबमध्ये असल्याची माहिती मिळाली. मात्र मुलींनी तेथेही पोलिसांना चकमा दिला. या मुली कळंबवरून कॅनॉलच्या रस्त्याने थेट बाभूळगावला पोहोचल्या. या मुलींनी यवतमाळवरून वर्धा नंतर कळंब व तेथून बाभूळगाव असा प्रवास केला. बाभूळगावमध्ये शोध पथकाने या मुलींना एका जंगल परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी त्या मुलींची महिला पोलीस अधिकारी गायकवाड यांनी समजूत काढत त्यांना यवतमाळला आणले.
नेमक्या पळून का गेल्या याची विचारणा केली असता त्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी न झाल्याचे कारण सांगितले. यावरून मुली किती दबावात असतात हे लक्षात येते. दहावीचे वर्ष महत्वाचे असले तरी मुलांच्या मानसिकतेचा विचार करीत त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे सोईचे ठरणार आहे अन्यथा एका नव्या समस्येला पालकाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.