महसूल भवनात भरविला विद्यार्थ्यांचा वर्ग
By admin | Published: July 17, 2016 12:43 AM2016-07-17T00:43:52+5:302016-07-17T00:43:52+5:30
वणी शहरातील २०० वर विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही महाविद्यालयांमध्ये विज्ञान व वाणिज्य
अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर : चार दिवसांचा अल्टीमेटम
वणी : वणी शहरातील २०० वर विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही महाविद्यालयांमध्ये विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. दरम्यान, शनिवारी येथील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क येथील महसूल भवनात ११ वीचा वर्ग भरविला.
अतिशय शांततेने पार पडलेल्या या प्रतिकामत्मक आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी महसूल भवनात पोहचले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या. मार्गदर्शनही केले. यावेळी १७० विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
न्यायासाठी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या नावाने स्थापन केलेल्या समितीचे पदाधिकारी स्वप्नील धुर्वे, विकेश पानघाटे, नगरसेवक अखिल सातोकर, प्रविण खानझोडे, नगरसेवक सिद्धीक रंगरेज, श्रीकांत ठाकरे, ज्ञानदीप निमसटकर, वैभव डंबारे, संदेश तिखट आदींनी लढा सुरू केला आहे.
या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी वणीतील काही महाविद्यालयांना पत्र देऊन संबंधित विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश देण्याच्या सूचना केल्या. मात्र आमच्याकडे जागाच शिल्लक नसल्याने आम्ही प्रवेश देण्यास हतबल आहोत, अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली आहे. परिणामी आजही २०० वर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी शनिवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क महसूल भवनातच ११ वीचा वर्ग भरविला. राष्ट्रगितानंतर वर्ग सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांची हजेरीही घेण्यात आली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा व पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी महसूल भवनात दाखल झालेत. त्यांनी प्रवेशाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (कार्यालय प्रतिनिधी)