कोठारीत कडक बंदोबस्तात दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:01 PM2018-03-05T23:01:02+5:302018-03-05T23:01:02+5:30
कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोठारीच्या आदर्श विद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी दहावीचा हिंदीचा पेपर कडक बंदोबस्तात झाला. शिक्षण विभागासह पोलीस येथे तळ ठोकून असल्याने कुणीही कॉप्या पुरविण्यासाठी इकडे फिरकले नाही.
आॅनलाईन लोकमत
बिजोरा : कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोठारीच्या आदर्श विद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी दहावीचा हिंदीचा पेपर कडक बंदोबस्तात झाला. शिक्षण विभागासह पोलीस येथे तळ ठोकून असल्याने कुणीही कॉप्या पुरविण्यासाठी इकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला.
संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी विविध पथकांसह बैठे पथकही तयार करण्यात आले. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात पहिल्याच पेपरला वेगळाच अनुभव आला. थेट वर्गात जाऊन कॉप्या देण्यापर्यंत मजल विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची झाली होती. या परीक्षा केंद्राला जणू जत्रेचेच स्वरूप आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताने कॉपी बहाद्दरांसह शिक्षण विभागातही खळबळ उडाली. शिक्षण विभागाने याची दखल घेत संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले.
दरम्यान सोमवारी या परीक्षा केंद्रावर हिंदीचा पेपर झाला. येथे सकाळपासूनच चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. महागाव येथील पाच पोलीस येथे तैनात करण्यात आले होते. तर सहायक पोलीस निरीक्षक ए.आर. दोनकलवार यांनी भेट देऊन पाहणी केली. शिक्षण विभागातर्फे उपशिक्षणाधिकारी दत्ता रोहणे तब्बल दोन तास येथे तळ ठोकून होते.
यामुळे या परीक्षा केंद्रावर आज कुणीही फिरकले नाही. अतिशय शांत वातावरणात परीक्षा पार पडली. हुशार विद्यार्थ्यांनी शांततेत पेपर सोडविला. आता या कॉपी बहाद्दर परीक्षा केंद्रावर काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परीक्षा सुरळीत सुरू असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.