सफाई कंत्राटाची घाण साफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:05 PM2019-07-12T22:05:56+5:302019-07-12T22:07:11+5:30
शहर सफाईच्या कंत्राटात सुमारे १३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारात सफाई कामगार भरडला जात आहे. त्यांना करार आणि किमान वेतन मिळत नाही. हा प्रश्न घेऊन कामगारांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर सफाईच्या कंत्राटात सुमारे १३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारात सफाई कामगार भरडला जात आहे. त्यांना करार आणि किमान वेतन मिळत नाही. हा प्रश्न घेऊन कामगारांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थायी कामगार विकास संघटनेच्या पुढाकारात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने जानेवारी २०१५ ते आजपर्यंत मर्जीतल्या लोकांनाच साफसफाईचे कंत्राट दिले. सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. तीन लाखांपेक्षा अधिक रकमेचे कुठलेही काम ई-निविदा पद्धतीने देण्यात यावे, असे निर्देश आहे. शिवाय तुकडे पाडून कंत्राट देता येत नाही. यवतमाळ पालिकेत मात्र या सर्व प्रकाराला तिलांजली देण्यात आली आहे.
कंत्राटी सफाई कामगाराला १३ हजार ३८ रुपये मासिक वेतन आहे. यानुसारच कंत्राटदाराने पालिकेकडून रकमेची उचल केली. प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतन मिळाले नाही. करारानुसार कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाही. या सर्व प्रकारात काही नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची हातमिळवणी आहे. सफाई कामगारांवर अन्याय होत आहे. पालिकेत सफाई कंत्राटाविषयी झालेल्या १३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष विनोद शेंडे यांनी सांगितले. आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.