चारगावच्या पंपाला वजनमापेने दिली होती क्लिनचिट
By admin | Published: July 5, 2017 12:16 AM2017-07-05T00:16:59+5:302017-07-05T00:16:59+5:30
ठाणे क्राईम ब्रँचने तपासणी केलेल्या चारगाव येथील पेट्रोल पंपाला वजनमापे विभागाच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वीच क्लिनचिट दिली होती.
सहा महिन्यापूर्वीच तपासणी : अनेक दिवसांपासून सुरू होता गोरखधंदा, कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ठाणे क्राईम ब्रँचने तपासणी केलेल्या चारगाव येथील पेट्रोल पंपाला वजनमापे विभागाच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वीच क्लिनचिट दिली होती. मात्र सोमवारी झालेल्या कारवाईनंतर गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल पंपावर सुरू असलेला लुटीचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. या पंपाला आता सील लावण्यात आले आहे.
ठाणे येथील गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी चारगाव येथील सुखकर्ता पेट्रोल पंपावर धाड टाकून पंपाची तपासणी केली. त्यावेळी मोठे गौडबंगा उघडकीस आले. या पथकाने केलेली ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई आहे. ग्राहकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या पेट्रोलची बेमालुमपणे चोरी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सुत्रधार विवेक शेट्टी आणि अविनाश नाईक या दोघांना उत्तरप्रदेश एसआयटीने सर्वप्रथम ताब्यात घेतले.
त्यानंतर ठाणे पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी २६ जूनला सर्वप्रथम नागपूर येथील अनेक पेट्रोल पंपावर धाडी टाकून कारवाई केली. त्यानंतर रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे धाड टाकून पेट्रोल पंपावर कारवाई केली. त्यापाठोपाठ सोमवारी हे पथक चारगावात येऊन धडकले. या पथकाने मदन येंडे यांच्या मालकीच्या सुखकर्ता पेट्रोल पंपाची तपासणी केली. त्यावेळी मदर बोर्डमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचे उजेडात आले. यामुळे पाच लीटर डिझेलमागे १२० मि.ली. लीटरचा फरक आढळून आला.
पेट्रोल पंपाच्या मदर बोर्डमधील आयसीमध्ये हेराफेरी केल्याचेही यावेळी दिसून आले. यात पाच लीटर पेट्रोलमागे २० मिलीचा फरक दिसून आला. त्यातून आजवर ग्राहकांची हजारो रूपयाने लूट करण्यात आली. सोमवारची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर या पेट्रोल पंपाला सील ठोकण्यात आले. यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी सुखकर्ता पेट्रोल पंपमधील मदर बोर्ड व एक पल्सर सोबत नेले. फॉरेन्सीक लॅबमध्ये या साहित्याची तपासणी करण्यात आल्यानंतर प्राप्त अहवालानुसार संबंधित पेट्रोल मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यासंदर्भात वजनमापे निरीक्षक स.वा.कटके व मोरे यांना विचारणा केली असता, आम्ही सहा महिन्यापूर्वीच या पेट्रोल पंपाची तपासणी केली होती. त्यावेळी कुठलाही फरक आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. चारगाव येथील पेट्रोल पंपावर कारवाई केल्यानंतर तालुक्यातील अन्य पेट्रोल पंपधारकाच्या मनातही धडकी भरली आहे. हे पथक कोणत्या क्षणी तपासणी करेल, याचा अंदाज कुणालाच नसल्याने आता पुढील कारवाई कोणत्या पेट्रोल पंपावर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका टँकरमागे ४० ते ५० हजारांची होते कमाई
पेट्रोल पंपात तांत्रिक हेराफेरी करून ग्राहकांना लुटण्याचा हा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतील फरक लक्षात घेता एका टँकरमागे पेट्रोल पंपधारक ४० ते ५० हजार रूपयांची कमाई करीत असल्याची बाबही या कारवाईनंतर पुढे आली आहे. याव्यतिरिक्त पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचा डोळा चूकवत दांडी मारण्याचा गोरखधंदाही बेमालुमपणे सुरू आहे. यातूनही ग्राहकांची लूट केली जात आहे.