शेतकऱ्यांनाच बनविले ग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:42 PM2019-03-01T23:42:58+5:302019-03-01T23:45:23+5:30
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग आणि त्यातून मिळविलेले उत्पन्न यासंदर्भातील माहिती मिळणे अपेक्षित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग आणि त्यातून मिळविलेले उत्पन्न यासंदर्भातील माहिती मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही माहिती थोडी आणि शेतकऱ्यांना ग्राहक बनवून विक्रेत्यांचेच भले करण्याचा उद्देश स्पष्ट झाला.
महागडे ट्रॅक्टर, ड्रिप, मोटरपंप, सोलरपंप, विविध प्रकारचे बियाणे बुकिंग याच्या स्टॉलची संख्या अधिक आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतला जात होता. आपली कंपनी आणि त्यांचे प्रॉडक्ट किती चांगले आहे याची माहिती प्रत्येक जन देत होता.
कृषी प्रदर्शनात येणारा शेतकऱ्याला इतर यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा न कळता, कुठल्या कंपनीचे उत्पादन किती चांगले, त्यांच्या किमती किती, याचेच पॉम्पलेट घेऊन जाताना दिसत होते. शेतकऱ्यांना अपेक्षित गुलाबी बोंडअळीवर मात करणारे कपाशीचे संशोधित वाण दिसले नाही. कृषी महोत्सव म्हणजे मोठ्या कंपन्यांसाठी ग्राहक शोधून देणारा उत्सव ठरला. या ठिकाणी चर्चासत्रांसाठी शेतकरीच नाहीत. तीन दिवसांपासून अशीच अवस्था आहे. चर्चासत्राच्या ठिकाणी सतत रिकाम्या खुर्च्या आणि आठ-दहा शेतकरी, अशी अवस्था आहे.
किसान काँग्रेस करणार राज्यपालाकंडे तक्रार
कृषी महोत्सवावर २५ लाखांचा खर्च होत आहे. मात्र शेतकरीच महोत्सवापासून दूर आहे. सहा हजाराचा स्टॉल २० हजारात देण्यात आला. महोत्सवात बाहेरगावाच्या नावावर भोजनाचे स्थानिक स्टॉल असल्याचा आरोप किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. महोत्सवाचा २५ लाखांचा खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा. महोत्सवातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष चंदू चौधरी, महिला शहर अध्यक्ष उषा दिवटे, प्रदीप डंभारे, उमेश इंगळे, अजय किनकर, घनश्याम अत्रे, अरूण ठाक ूर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नावावर शिरले व्यापारी
कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी स्टॉल लावल्याचा संशय बळावला आहे. काही उत्पादने कलर मिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला. ग्राहकांना घरी आल्यानंतर याचा उलगडा झाला. खास करून सोपेबाबत हा प्रकार घडला. त्याची महोत्सवातील किंमत आणि बाजारातील दर सारखेच आहे. यामुळे ग्राहकांची नाराजी झाली.