दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करा
By admin | Published: June 29, 2017 12:09 AM2017-06-29T00:09:44+5:302017-06-29T00:09:44+5:30
जिल्ह्यात दारू, मटका, जुगार खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यवसायांना
पोलिसांना निर्देश : ठाणेदारांवर कारवाईची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात दारू, मटका, जुगार खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या ठाणेदारांना निलंबित करावे, असे निर्देश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचाही आढावा घेतला गेला. एसपींचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला तिवारी यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही अवैध व्यवसायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तिवारी म्हणाले, जिल्ह्यात वरली, मटका, जुगार सर्वत्र सुरू आहे. पोलीस हे अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी गावठी दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक सुरू आहे. असे असतानाही पोलिसांनी धाडी घालून मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. शहरी व ग्रामीण नागरिकांचा दारू, मटका, जुगारला प्रचंड विरोध असतानाही जनतेच्या नाकावर टिच्चून अप्रत्यक्ष पोलीस संरक्षणात हे धंदे चालविले जात आहे. या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या ठाणेदारांना तत्काळ निलंबित करा, वरिष्ठांचे ऐकले जात नसेल तर आम्ही वरिष्ठांवर कारवाईची मागणी करू, अशी भूमिका आपण बैठकीत मांडल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. यवतमाळ : जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकरी आणि नागरिकांना प्रतीक्षा आहे. पावसाअभावी अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
महामार्गावर दारू खुलेआम
महामार्गावर ५०० मीटर क्षेत्रातील दारू दुकाने बंद केली असली तरी प्रत्यक्षात आजही तेथे वाईन बार, हॉटेल, ढाबे येथून सर्रास दारू विक्री सुरू असल्याचा प्रकार किशोर तिवारी यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला. महामार्गावर पोलीस व एक्साईजच्या ‘आशीर्वादा’ने दारू विक्री सुरू असल्याचे ते म्हणाले.