कोठा येथील दारूचे दुकान बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:46 AM2017-09-27T00:46:41+5:302017-09-27T00:46:53+5:30
तालुक्यातील कोठा (वेणी) येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करावे, यासाठी परिसरातील हजारो महिलांनी सनदशीर मार्गाने अनेकदा आंदोलने केलीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील कोठा (वेणी) येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करावे, यासाठी परिसरातील हजारो महिलांनी सनदशीर मार्गाने अनेकदा आंदोलने केलीत. हजारोंच्या संख्येने महिलांनी ठिय्या आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रशासन जागे झाले नाहीत. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना महिलांनी निवेदन देत दारूचे दुकान कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी कळंब तालुक्यातील महिलांनी लाऊन धरली.
गावच्या मध्यभागी दारूचे दुकान असल्यामुळे दारू पिणाºयांची संख्या वाढली आहे. शाळकरी मुलेही दारूच्या आहारी गेले आहे. याचे नरकयातनामय दुष्परिणाम महिला आणि कुंटुबाला भोगावे लागत आहे. या दुकानातून आजूबाजूच्या २० गावांना दारूचा पुरवठा केला जातो. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन या गोष्टींकडे आर्थीक देवाणघेवाणीतून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या महिलांचा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन दारूच्या जाचातून गावकरी व परिसरातील नागरिकांची मुक्तता करण्यासाठी दारूचे दुकान बंद करावे, अशी मागणी केली आहे.
येत्या पाच दिवसात दारूचे दुकान बंद न केल्यास हा लढा अधीक तीव्र करण्यासाठी महिला आमरण उपोषण करतील, असा इशारा स्वामीनी दारुबंदीच्या तालुका संयोजक मनिषा काटे, मंगला आत्राम, सुशिला चाकले, इंदिरा रोहनकर, प्रणिता नागतोडे, गीता जहानपुरे, शकुना सहस्त्रबुद्धे, लक्ष्मी सहस्त्रबुद्धे, तुळसा मसराम, निर्मला ठाकरे, रंजना खसाळे, वनिता गाडगे, रेखा भगत आदी महिलांनी दिला आहे.