नवीन सभासदांचा कर्ज मिळण्याचा मार्ग बंद
By admin | Published: July 17, 2014 12:20 AM2014-07-17T00:20:53+5:302014-07-17T00:20:53+5:30
शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर
यवतमाळ : शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह लागणार आहे. तसेच नवीन सभासदांना कर्ज मिळण्याचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेकडे दरवर्षी पैशांची मागणी करते. या पैशावर जिल्हा बँकेचे कर्जवाटप धोरण ठरते. राज्य सहकारी बँक गत तीन वर्षांपासून जिल्ह्याला पुरसे पैसेच देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्ज वाटपात अडचणी येत आहेत.
२०१४-१५ साठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेकडे ४०० कोटी रूपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला २३० कोटी रूपयेच मंजूर करण्यात आले. जिल्हा बँकेला ६२१ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बँकेने सध्यास्थितीत ५३ हजार ४४३ शेतकऱ्यांना ३३० कोटी रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. काही कर्ज बँककडे असलेल्या ठेवितून वितरीत केले आहे. त्यामुळे कर्जवाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केच्या घरात पोहचले आहे. वाटप करण्यात आलेले कर्ज जुन्याच सभासदांना वितरीत करण्यात आल्याने नवीन सभासदांना एक छदामही मिळाला नाही. (शहर वार्ताहर)