उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:00 AM2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:00:22+5:30

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये संतापाचा सूर व्यक्त होत आहे. आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यासक्रमांच्या रुपांतरणासाठी समिती नेमली असून दोन वर्षांपासून ही समिती बैठकांवर बैठका घेत आहे, मात्र अद्यापही ही समिती निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. अशावेळी शासन निर्णय मात्र जारी करण्यात आली आहे. दहावीमध्ये कमी टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम एमसीव्हीसी अभ्यासक्रमांनी केले. एमसीव्हीसीच्या अनेक विद्यार्थ्यांनी छोटे मोठे स्वयंरोजगार, व्यवसाय सुरू केले आहेत.

Closed high school business courses; Hit the students | उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांना फटका

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांना फटका

Next
ठळक मुद्देखेड्यात मिळणारा रोजगारही दुरापास्त होण्याची शक्यता; शिक्षकही नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकीकडे मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया.. असा घोष केला जात आहे. दुसरीकडे स्वयंरोजगारासाठी तरुणांना प्रेरणा देणारे अभ्यासक्रमच अडचणीत आणण्याचे काम शासन स्तरावरून केले जात आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. राज्य शासनाने हे अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) आता आयटीआयमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे ग्रामीण ‘बेस’ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मोठे विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये संतापाचा सूर व्यक्त होत आहे. आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यासक्रमांच्या रुपांतरणासाठी समिती नेमली असून दोन वर्षांपासून ही समिती बैठकांवर बैठका घेत आहे, मात्र अद्यापही ही समिती निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. अशावेळी शासन निर्णय मात्र जारी करण्यात आली आहे. दहावीमध्ये कमी टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम एमसीव्हीसी अभ्यासक्रमांनी केले. एमसीव्हीसीच्या अनेक विद्यार्थ्यांनी छोटे मोठे स्वयंरोजगार, व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात अपवाद वगळता शासनाने या अभ्यासक्रमांना अनुदान देण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वाटल्यास, अभ्यासक्रमाच्या रचनेत मात्र वारंवार बदल केले. त्यामुळे या ‘स्किम’ला अजूनही स्थैर्य मिळू शकलेले नाही. आता अभ्यासक्रमच आयटीआयमध्ये रुपांतरित करण्याचा नावाखाली बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या शासकीय संस्था अत्यल्प आहेत. त्यांचे आयटीआयमधील रुपांतरण सहज शक्य आहे. मात्र बहुतांश संस्था या अनुदानित, विनाअनुदानित आहेत. तेथील कर्मचाऱ्यांसमोर अडचणी उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. 

व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणारे शिक्षक म्हणतात...

राज्य शासनाने उच्च माध्यमिकच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे आयटीआयमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा आहे. कारण यात टेक्नीकल अभ्यासक्रम कनव्हर्ट होतील, पण मेडीकल, ॲग्रीकल्चर, काॅमर्स असे विषय आयटीआयमध्ये कसे रुपांतरित होतील? दहावीतील कमी टक्केवाल्या विद्यार्थ्यांना याच अभ्यासक्रमातून रोजगार मिळाला आहे. पण शासन या अभ्यासक्रमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे 
- प्रवीण भोयर, यवतमाळ

आता आमच्यापैकी ८० टक्के शिक्षक येत्या ३-४ वर्षात निवृत्त होणार? आहेत. या रुपांतरणामुळे त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. चांगले सुरू असलेले अभ्यासक्रम बंद करून काय साध्य होणार? त्यापेक्षा या अभ्यासक्रमांना फंड देऊन शासनाने अपग्रेड केले पाहिजे. 
- प्रमोद बोरा, यवतमाळ

आम्ही या स्किममध्ये २५-३० वर्षे सेवा दिली. ८० टक्के लोकांचे वय ५० वर्षावर आहे. अशावेळी नव्या स्किममध्ये रुळण्यासाठी वेळ लागणार आहे. सिलॅबस जुनाच असला तरी स्किम नवी राहणार आहे. कोरोनामध्येही आम्हाला चांगल्या ॲडमिशन मिळाल्या. त्यावरूनच या अभ्यासक्रमाचे महत्त्व शासनाने लक्षात घ्यावे. 
- सुनिल कडू, यवतमाळ

पदव्या मिळवून घरी बसावे का? विद्यार्थ्यांच्या गोटात भीतीची चर्चा 
 गेल्या काही वर्षांपासून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. मात्र याच अभ्यासक्रमातून खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना छोटे मोठे का होईना पण स्वयंरोजगार करता येत होते. मात्र आता हे अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यातून आता व्यवसाय अभ्यासक्रम शिकून रोजगार करण्यापेक्षा केवळ पदव्या मिळवा अन् घरी बसा अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेकडो युवकांसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. आता व्यवसाय अभ्यासक्रमाचे धडे कुठे गिरवावे असा प्रश्न आहे. 

Web Title: Closed high school business courses; Hit the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.