बाजार समितीत धान्य खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:58 PM2018-10-10T23:58:05+5:302018-10-10T23:59:29+5:30
वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात अडते युनियन संघाने बाजार समितीला निवेदन दिले आहे.
३ आॅक्टोबरपासून वणीच्या बाजार समितीत सोयाबीनच्या खासगी खरेदीला प्रारंभ झाला. सोयाबीनला भाव चांगला मिळू लागल्याने बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी दररोज शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली. अशातच मंगळवारी अडते युनियन संघाने बाजार समितीच्या सभापतींना निवेदन देऊन अडत्यांच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर ११ आॅक्टोबरपासून धान्य खरेदी बंद ठेवण्याबाबत निवेदन दिले. वणीच्या बाजार समितीत ७० ते ७५ परवानाधारक अडते असले तरी प्रत्यक्षात २५ ते ३० अडते काम करतात. अडते युनियन संघाच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणी बाजार समितीला वारंवार निवेदने देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र त्या पूर्ण न झाल्याने अडते युनियन संघाने जोवर मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत धान्य लिलावात भाग घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
बाजार समितीच्या परवानाधारक धान्य व्यापाºयांनी खुल्या लिलावाद्वारे खरेदी केलेल्या धान्य मालाच्या चुकाºयाची पाच-सहा महिन्यापासूनची रक्कम धान्य अडत्यांना अद्यापपर्यंत दिली नाही. बाजार समितीमध्ये ई-नाम योजनेअंतर्गत ई-लिलाव व ई-पेमेंटची पद्धत असूनही १ आॅक्टोबर २०१८ पासूनच्या धान्य चुकारांच्या रकमा संबंधित शेतकºयांच्या व अडत्यांच्या खात्यांमध्ये अद्याप जमा करण्यात आल्या नाही. त्या जमा करण्यात याव्या, बाजार समितीने अनेक व्यापाºयांना धान्य खरेदीचे परवाने दिले आहेत. परंतु ई-लिलावामध्ये मोजकेच व्यापारी भाग घेतात. सध्या नवीन सोयाबीन बाजार समितीमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत पुरेसे धान्य व्यापारी लिलावामध्ये सहभागी असणे गरजेचे असल्याचे अडते युनियन संघाचे म्हणणे आहे. बाजार समितीच्या आवाराबाहेर अनेक ठिकाणी विना परवाना धान्य मालाची खरेदी सुरू असून ती बंद करण्याची मागणी आहे. सर्व अडत्यांना ४ सप्टेंबरपासून जीएसटीच्या कक्षात आणण्यात आले आहे. बाजार समितीत काम करणाऱ्या परवानाधारक अडत्यांना त्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांना आता केवळ तारण योजनेचा आधार
गुरूवारपासून अडत्यांनी धान्य लिलावात भाग न घेण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीत धान्य विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. ती होऊ नये, यासाठी शेतकºयांना तारण योजना आधार ठरणार असल्याचे सभापती संतोष कुचनकार यांनी सांगितले.