यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा

By विशाल सोनटक्के | Published: July 22, 2023 12:37 PM2023-07-22T12:37:37+5:302023-07-22T12:38:15+5:30

यवतमाळ तालुक्यात २४ तासात २३६ तर महागाव तालुक्यात २३१ मिमी पाऊस कोसळला

Cloudburst in Yavatmal; Flood situation in many places, 14 taluks hit by heavy rain | यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा

यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा

googlenewsNext

यवतमाळ : शुक्रवारी रात्री यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागाला मुसळधार पावसाने झोडपले. ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात  २३६ मिमी तर महागाव तालुक्यात १३१ मिमी पावसाची नोंद झाली असून १६ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक  ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे पुराच्या पाण्यात दोन घरे वाहून गेली. येथील सुमारे ४५ नागरिक पुरात अडकले आहेत. सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून  हेलीकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत येत आहे.

यवतमाळ येथे वाघाडी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी नदी काठच्या अनेक घरात शिरले आहे. याच परिसरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आर्णी तालुक्यातील दातोडी, थड येथेही पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदी काठच्या गावात पैनगंगेचे पाणी  शिरल्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. आर्णी शहरात अरुणावतीचे पाणी नदीकाठच्या अनेक घरात शिरले आहे. तर वडगाव जंगल पोलीस स्टेशन येथे पुराचे पाणी गावात शिरले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

यवतमाळ शहरातील गोदामफैल, वडगाव, लोहारा, वाघापूर आदी सखल भागातही पावसाचे पाणी शिरले आहे. झरी जामणी तालुक्यातील दिग्रस येथे पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असून, महाराष्ट्र-तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अकोलाबाजार येथे नदीचा बांध फुटून पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार माजला आहे. महागाव तालुक्यातील धनोडा ते माहूर येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: Cloudburst in Yavatmal; Flood situation in many places, 14 taluks hit by heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.