मेडिकल कॉलेजमध्ये क्लबफूट शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 09:52 PM2019-01-24T21:52:20+5:302019-01-24T21:53:02+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालविता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालविता येते. यासाठीच ‘मेडिकल’मध्ये अस्थीव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून आता ही सेवा यवतमाळातही मिळणार आहे.
क्यूअर इंडिया या संस्थेच्यावतीने राज्यात ट्रिट क्लबफूट टूडे हे अभियान राबविले जात आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यांच्यावतीने या मोहिमेबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र स्टेट लेव्हल क्लब फूट मॅनेजमेंट प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण भागात व गरीब कुटुंबातील मुलांमध्ये पायाला वाक असणे, हाताला वाक असणे ही व्याधी दिसून येते. मात्र जन्मत:चा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उपचार असतानाही एखाद्या दिव्यांगाप्रमाणे ही मुलं जगतात. योग्यवेही वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया केल्यास त्यांच्या हातापायाला असलेला वाक पूर्णत: घालविता येऊ शकतो. त्यासाठी काही जुजबी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अशा शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण मेडिकलमधील डॉक्टरांना देण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावीपणे राबविला जाईल, असे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी सांगितले. गरीब रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे.