उमरखेड येथे अवैध सावकाराच्या घर-दुकानावर सहकारची धाड
By admin | Published: July 13, 2017 12:11 AM2017-07-13T00:11:44+5:302017-07-13T00:11:44+5:30
अवैध सावकारी प्रकरणी येथील एका सावकाराच्या घरासह दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त : धनादेशाच्या अनादरानंतर तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अवैध सावकारी प्रकरणी येथील एका सावकाराच्या घरासह दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी हनुमान वॉर्ड आणि गोचरस्वामी वॉर्डात धाड मारली. यावेळी २६ प्रकारचे आक्षेपार्ह कागदपत्रे आणि नोंदीच्या वह्या जप्त करण्यात आल्या.
गोविंद सोमानी असे धाड टाकण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. तो उधारीवर दिलेल्या पैशाच्या बदल्यात संबंधितांकडून कोरे धनादेश घेत होता. पैसे दिले नाही तर अवास्तव रक्कम टाकून धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकत होता. धनादेश अनादरीत झाला तर न्यायालयात दाद मागून संबंधिताला त्रास देत होता.
या प्रकरामुळे त्रस्त झालेल्या के.के. झेरॉक्सचे मालक सतीश कदम यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.
कदम यांनी सोमानी यांच्याकडून सहा हजार रुपये उसणवार घेतले होते. त्याबदल्यात पाच कोरे धनादेश घेण्यात आले. त्यावर दोन लाख ७५ हजार रुपये लिहून तो बँकेत वटविण्यासाठी टाकण्यात आला. धनादेश अनादरीत झाल्याने सावकाराने प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तसेच मानसिक त्रास देणे सुरू केले. या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, ए.डी. भागानगरे, एस.एस. पिंपळखेडे, ओ.एम. पहुरकर, पोलीस निरीक्षक एस.पी. उन्हाळे, ए.आर. पौळ, के.एस. कोरे यांनी हनुमान नगरातील सोमानी यांच्या घरी आणि गोचरस्वामी वॉर्डातील दुकानावर धाड मारली. त्या ठिकाणाहून नोंदीच्या वह्या आणि २६ प्रकारची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.