वणी क्षेत्रातील कोळसा खाणींना घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:57 PM2018-08-13T21:57:18+5:302018-08-13T21:57:43+5:30
कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये कपात करणे सुरू केल्यामुळे कामगार तणावात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये कपात करणे सुरू केल्यामुळे कामगार तणावात आले आहेत.
काळ्या हिऱ्यांची खाण म्हणून वणी क्षेत्रातील कोळसा खाणींकडे पाहिले जात होते. परंतु अलिकडे काही वर्षांत कोळसा खाणीतील उत्पन्न घटल्याने पिंपळगाव, कुंभारखणी, कोलारपिंपरी व घोन्सा या चार कोळसा खाणी बंद करण्यात आल्या असून भांदेवाडा ही भूमिगत कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. बंद पडलेल्या कोळसा खाणीतील कामगारांपैकी काहींना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वेकोलि क्षेत्रात पाठविण्यात आले, तर काहींना परप्रांतात रवाना करण्यात आले. यामुळे या कामगारांचे कुटंूब विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक उत्पन्न देणारी उकणी कोळसा खाणदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. कोळसा खोल गेल्याने उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, ते वेकोलिला पेलवत नसल्याने नजिकच्या काळात या कोळसा खाणीवरदेखील बंद होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
वणी तालुक्यातील घोन्सा येथील कोळसा खाण गेल्या तीन वर्षापासून बंदावस्थेत आहे. मध्यंतरी ही कोळसा खाण एका खाजगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र या भाग खडकाळ असल्याने सदर कंत्राटदाराने खाणीचे काम सोडले. आता स्वत: वेकोलिच ही खाण सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. बंद असलेल्या कोळसा खाणीतील १३० कामगारांना घोन्सा कोळसा खाणीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उकणी, जुनाडा या कोळसा खाणीतील यंत्र घोन्सा कोळसा खाणीत हलविणे सुरू झाले आहे. या कोळसा खाणीला वार्षिक सहा लाख टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे वेकोलितील सूत्रांनी सांगितले. लवकरच ही खाण सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.